Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीप्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच – योगी आदित्यनाथ

प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच – योगी आदित्यनाथ

केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालावर विधानसभेत खुलासा

लखनऊ: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पाणी प्रदूषित नसून शुद्धच असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. केंद्रीय प्रदूषण मंडाळाने प्रयागराजचे पाणी शुद्ध नसल्याचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केलाय. त्यापार्श्वभूमीवर योगींनी विधानसभेत आज, बुधवारी हा खुलासा केला आहे.

यासंदर्भात योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रयागराजमध्ये ड्रेनेज सिस्‍टिम उत्तमरित्‍या काम करत असून सर्व ड्रेनेज पाईपलाईनमधील पाणी पूर्ण शुद्धीकरण करुनच नद्यांमध्ये सोडले जाते. उत्तरप्रदेश प्रदूषण महामंडळ दररोज पाण्याची गुणवत्ता तपासते. संगमाजवळील आजच्या पाण्याचा बायोकेमीकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्‍सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्क्यांपर्यंत आहे.

संगमावरील पाणी केवळ स्‍नानासाठीच नाही तर ‘आचमन‘ घेण्यासाठीही अगदी शुद्ध आहे असा दावा त्‍यांनी केला. त्‍याचबरोबर पाण्यातील मानवी मलमुत्रामुळे कॉलीफॉर्म वाढल्‍याचा दावाही त्‍यांनी फेटाळला. त्‍यांनी सांगितलेकी हे प्रमाण प्रति १०० एमएल पाण्यात २५०० एमपीएनपेक्षा कमीच आहे. राष्‍ट्रीय हरीत लवादानेही महाकुंभवेळी पाण्यातील मानवी मलमुत्राचे प्रमाणही नियमानुसार असून प्रति १०० एमएल मध्ये २००० पेक्षा कमी एमपीएन एवढे आहे असे स्‍पष्‍ट केले आहे. सेंट्रल पोल्‍युशन कंट्रोल बोर्डाने (सीपीसीबी) प्रति १०० एमएल पाण्यात २००० एमपीएन (Most Probable Number )प्रमाणाला काही अपवादात्‍मक वेळा परवानगीयोग्‍य आहे असे म्‍हटले. हे प्रमाण ५०० एमपीएन अगदी योग्‍य आहे.

योगी आदित्‍यनाथ यांनी या गोष्‍टींचा संदर्भ घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाकुंभला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्‍याचा आरोप त्‍यांनी यावेळी केला. काही लोक महाकुंभ मेळा बदनाम करण्यासाठी कॅम्‍पेनिंगच चालवत आहेत असेही ते म्‍हणाले. केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्रयागराजमध्ये ७३ ठिकाणांहून पाण्याचे नमूने गोळा करुन त्‍याची चाचणी केली होती. यासाठी सहा वेगवेगळे निकष लावले होते. पाणि किती आम्‍लयुक्‍त किंवा अल्‍कधर्मीय आहे याची तपासणी करुन हा अहवाल राष्‍ट्रीय हरीत लवादाकडे दाखल केला होता. हरीत लवादापुढे प्रयागराजमधील पाण्यात मलनिसाःरण करु नये अशा मागणीची याचिका दाखल आहे. त्‍यावर सध्या सुनावणी सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -