Sunday, August 24, 2025

दिल्लीचा मुख्यमंत्री काही तासांत जाहीर होणार

दिल्लीचा मुख्यमंत्री काही तासांत जाहीर होणार
नवी दिल्ली : शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा होत आहे. हा मुहूर्त साधून भारतीय जनता पार्टी संध्याकाळपर्यंत दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करणार आहे. भाजपाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांची बैठक संध्याकाळी होणार आहे. या बैठकीत आमदार त्यांचा नेता निवडतील. हा नेताच दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा भावी मुख्यमंत्री २० फेब्रुवारी २०२५ रोजी रामलीला मैदानावर भव्य सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहे. या सोहळ्यासाठी किमान ३० हजार जणांना आमंत्रण दिले जाणार आहे. सोहळ्यासाठी ४० फूट बाय २४ फूटचा मोठा मंच आणि दोन ३४ बाय ४० फुटांचे मंच उभारले जाणार आहेत. मंचावर १०० ते १५० जणांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभेच्या ७० पैकी ४८ जागा भारतीय जनता पार्टीने आणि २२ जागा आम आदमी पार्टीने जिंकला. काँग्रेस पक्ष सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू शकलेला नाही. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव करणाऱ्या भाजपाने दणदणीत विजय मिळवला. हा विजय मिळाला तरी भाजपाने अद्याप मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. हे उत्तर बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी मिळेल.
दिल्लीच्या मुख्यमंत्री या पदासाठी भाजपात सध्या सात नावांची चर्चा आहे. प्रवेश वर्मा, आशीष सूद, रेखा गुप्ता, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, जितेंद्र महाजन, शिखा रॉय या सात जणांपैकी एकाच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे. भाजपा १९९३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. त्यांनी मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव केला आहे. यामुळे भाजपासाठी दिल्लीतल्या विजयाला विशेष महत्त्व आहे.
Comments
Add Comment