Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

परीक्षा देण्यासाठी पॅराशूटद्वारे उड्डाण करुन पोहोचला विद्यार्थी

परीक्षा देण्यासाठी पॅराशूटद्वारे उड्डाण करुन पोहोचला विद्यार्थी
सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली आहे. पेपर देण्यासाठी विद्यार्थी पॅराशूटद्वारे उड्डाण करुन परीक्षा केंद्रावर पोहोचला. या घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.






आपली परीक्षा आहे हे विसरुन एक विद्यार्थी पाचगणीत फिरायला गेला होता. त्याला मैत्रीणीने परीक्षा सुरू होण्याआधी कॉल करुन आठवण करुन दिली. परीक्षा आहे हे लक्षात येताच आयत्यावेळी विद्यार्थ्याने परीक्षा केंद्र गाठण्याचा निर्णय घेतला. परीक्षा केंद्रावर गेलो तर तिथे इतरांकडून पेन पेन्सिल मागून घेऊ आणि पेपर देऊ असा विचार विद्यार्थ्याने केला. अनेकदा विद्यार्थी परीक्षेच्यावेळी पंचाईत नको म्हणून एक - दोन जास्तीचे पेन पेन्सिल आणतात. यामुळे मित्रांच्या मदतीने परीक्षा देता येईल, असा विचार करुन विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर जाण्याचा ठाम निर्णय घेतला. पाचगणीतील पर्यटन स्थळावरुन परीक्षा केंद्रावर आयत्यावेळी पोहोचणे अशक्य होते. पण प्रसंगावधान राखून विद्यार्थ्याने पर्यटनस्थळी असलेल्या पॅराग्लायडर्सची भेट घेतली. विद्यार्थ्याने पॅराग्लायडर्सच्या प्रमुखाला अडचण समजावून सांगितली आणि मदत मागितली.



पॅराग्लायडर्सच्या प्रमुखाने विद्यार्थ्याला एका प्रशिक्षित पॅराग्लायडर सोबत पॅराशूटमधून उड्डाण करणे हिताचे असल्याचा सल्ला दिला. यानंतर तातडीने पॅराशूटचे पट्टे विद्यार्थ्याच्या आणि एका प्रशिक्षित पॅराग्लायडरच्या कंबरेला बांधण्यात आले. मग काय, पॅराग्लायडर सोबत विद्यार्थ्याने उंचावरुन खाली परीक्षा केंद्राच्या दिशेने उडी मारली. पॅराशूटच्या मदतीने उड्डाण केलेला विद्यार्थी पक्षाप्रमाणे आकाशात विहार करत काही मिनिटांत परीक्षा केंद्रावर पोहोचला.
Comments
Add Comment