रत्नागिरी : गेले काही दिवस जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात धुके आणि थंड वातावरण तर दुपारी कडकडीत ऊन यामुळे हापूस कलमांवर लागलेली शेंगदाण्याएवढी कैरी पिवळी पडून गळून जात आहे. यंदा जानेवारी महिन्यात नैसर्गिकरीत्या मोहोर येण्याचे प्रमाण अल्प असल्याने मे महिन्यातील उत्पादन कमी राहील, अशी शक्यता आंबा बागायतदारांनी वर्तवली आहे. बदलत्या हवामानामुळे मोहोराला आलेली बारीक कैरी गळून जात आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झालेला आहे. आंबा फवारणी करूनही गळती थांबत नसल्याने अपेक्षेपेक्षा यंदा आंबा हंगाम कमी कालावधीचा राहील. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कलमांना मोहोरच आलेला नाही. त्यामुळे पहिल्या टप्यातील उत्पादन अत्यल्प राहिली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आलेल्या मोहोरावर मार्चअखेरीस उत्पादनाला सुरुवात होईल, यामधून एप्रिल महिन्यात आवक चांगली राहील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर आंबा आवक कमी होत जाईल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.
बदलत्या हवामानामुळे कैरीची गळ; बागायतदार चिंताग्रस्त
