वाडा (वार्ताहर) : जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजाला स्वतःच्या पोटाला चिमटा घेत मोठ्या मेहनतीने पिकवलेला टोमॅटो, भाजीपाला मातीमोल दराने विकायची वेळ आल्यामुळे डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही. बाजारात सध्या टोमॅटो दहा रुपये किलो दराने विकला जात आहे.
शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासह फळभाज्यांची लागवड केली; परंतु बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या बाजारपेठेत टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कष्ट घेऊन पिकवलेले टोमॅटो जनावरांना खायला देण्याची वेळ ओढवली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने टोमॅटोचा दर ८० ते १०० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत असल्याने त्यात आता बरीच घट झाली आहे.
शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केली होती. चार महिन्यात एकरी ८० हजार रुपये खर्च करून जोपासना केली. सुरुवातीला टोमॅटो ला प्रति किलो २० ते ३० रुपये दर मिळाला. परंतु सध्या बाजारात दहा रुपये दराने देखील टोमॅटोला विचारत नाही.
वैशाली वाणाच्या टोमॅटो उत्पादनात वाढ झाली आहे. या वाणाचे टोमॅटो जास्त दिवस राहत असल्याने मागणी जास्त आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत असताना, योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मिळत असलेल्या दरात तोडणी, वाहतुकीचा खर्च निघत नाही. टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांनी टोमॅटो शेतीतून आर्थिक उन्नती साधण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या अपेक्षेने लागवड केली होती. मात्र टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याने वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.