मुंबई : जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२५ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलचा अठरावा हंगाम २२ मार्च २०२५ पासून सुरू होत आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. हा सामना २२ मार्च रोजी रंगणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ मार्च रोजी दोन सामने खेळवले जातील. यातील पहिला सामना २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता होणार आहे. तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.
Mark your calendars, folks! 🥳🗓#TATAIPL 2025 kicks off on March 2️⃣2️⃣ with a clash between @KKRiders and @RCBTweets 🤜🤛
When is your favourite team’s first match? 🤔 pic.twitter.com/f2tf3YcSyY
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
यंदाच्या आयपीएलमध्ये १० संघ आहेत. स्पर्धेचे ७४ सामने १३ शहरांमध्ये रंगतील. लीग टप्प्यात चेन्नई आणि मुंबई दोन वेळा एकमेकांच्या विरोधात खेळतील. यंदा सात एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई यांच्यात फक्त एकच लीग सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे. सुरुवातीचे आणि अंतिम सामने दोन्ही कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होतील. या लीगचे आयोजन १३ ठिकाणी केलेले आहे. आयपीएल २०२५ मध्ये ६५ दिवसांत एकूण ७४ सामने खेळवले जातील. आयपीएल २०२५ मध्ये, लीग सामने २२ मार्च ते १८ मे दरम्यान खेळवले जातील. यानंतर, २०, २१, २३ आणि २५ मे रोजी प्लेऑफ सामने आयोजित केले जातील.
आयपीएल २०२५ चे सामने लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा येथे खेळवले जातील. आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर सामने आहेत. याचा अर्थ असा की एका दिवसात दोन सामने असे एकूण १२ दिवस होणार आहे. दरवर्षी आयपीएलचा पहिला सामना मागील हंगामाचा अंतिम सामना खेळणाऱ्या दोन संघांमध्ये खेळला जातो, परंतु यावेळी तसे होत नाही. गेल्या हंगामाच्या म्हणजेच आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते, परंतु आयपीएल २०२५ चा पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार आहे.