नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत शनिवारी (दि. १५) तळोजा फेज एक सेक्टर २८ मधील रायगड इस्टेट येथे सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
सिडकोतर्फे १२ ऑक्टोबर २०२४ रोजी माझे पसंतीचे सिडकोचे घर गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता २६ हजार सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
१६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळणार हक्काचे घर; गोरेगाव पत्राचाळीतील रहिवाशांची घराची प्रतीक्षा संपली
या गृहनिर्माण योजनेत सहभागी झालेल्या अर्जदारांना आपल्या पसंतीच्या १५ सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेतील २६ हजार घरांसाठी २१ हजार ५०० ग्राहकांनी अर्ज सादर केले आहेत. या सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण https://cidcohomes.com या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे.
अर्जदार या संकेतस्थळावर, त्यांच्या सिडको होम खात्यात लॉग इन करून सोडतीचा निकाल घरबसल्या पाहू शकणार आहेत. या सोडतीमधील यशस्वी उमेदवारांची यादी lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.