बीड : कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे मागील कही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आधी सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीखोर वाल्मिक कराड या प्रकरणाशी संबंधित असल्याचे आरोप झाले आणि धनंजय मुंडेंपुढे अडचणी निर्माण झाल्या. पाठोपाठ धनंजय मुंडेंना कौटुंबिक पातळीवर मोठा धक्का बसला. मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने करुणा शर्माला पोटगी द्या, असे निर्देश धनंजय मुंडेंना दिले. यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली असा आरोप करत करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली. या प्रकरणात परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठी ते परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे होते. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी पत्नी म्हणून राजश्री मुंडे आणि तीन मुलींचा तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. पण करुणा शर्मा यांच्या नावावरील संपत्तीबाबत माहिती देणे टाळले होते. ही माहिती लपवल्याप्रकरणी करुणा शर्मा यांनी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने धनंजय मुंडे यांना उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात होणार आहे.