आता होणार भट्टयांमध्ये पीएनजीचा वापर
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील येणाऱ्या महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड आणि चिंध्यांचा वापर आगभट्टींमध्ये करण्यात येतो. त्यामुळे वायू प्रदुषणात वाढ होत असल्याने महापालिकेने लाकडांचा वापर करण्यात येणाऱ्या बेकऱ्यांना भटटया पीएनजीचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार महालक्ष्मी येथील धोबीघाटांमध्येही जळावू लाकडाचा वापर केला जात असल्याने त्याठिकाणी पीएनजीसाठी पाऊल उचलले आहे. त्या दृष्टिकोनातून त्याठिकाणी पीएनजीची उभारणी केली जात आहे. मुंबई महापालिकेतंर्गत असलेल्या महालक्ष्मी धोबी घाटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. या धोबीघाटाचा विस्तार सुमारे ८१.४९ चौ.मी असून सन २०११ मध्ये जगातील सर्वांत मोठा धोबधाट म्हणून याची गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे नोंद झाली आहे.
धोबीघाटावर काम करणारा धोबी समाज हा धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्यादितशी संलग्न आहे. धोबी घाटातील कामगारांना दैनंदिन कामकाजा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली. गेल्या अनेक वर्षांपासून धोबी बांधव कपडे धूणे, रंगरंगोटी करण्यासंबंधीचे कामकाज करत आहेत. या ठिकाणी कपडे वाळविणे आणि कपडयांना इस्त्री करणे, या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर, भट्टी जाळण्यासाठी आणि पाणी उकळण्यासाठी इंधन म्हणून लाकडी सामुग्रीसह रसायने असलेल्या चिंध्या, टाकाऊ कापड आणि टाकाऊ प्लास्टिकचा वापर यांचा समावेश होतो.
मिशन रेबीज: मुंबईत सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण
या पद्धतीमुळे येथे काम करणाऱ्या लोकांमध्ये दमा, क्षयरोग तसेच कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे प्रमाणे वाढले आहे. शिवाय अशा ज्वलनामुळे मुंबईच्या पर्यावरणातील प्रदुषके वाढवण्यात मोठा हातभार लागतो. दररोज मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलिंडर वापरले जात असल्याने सध्याच्या जागेच्या मर्यादांमुळे स्टोरेज मर्यादांचा सामना करावा लागतो. तसेच एलपीजी सिलिंडरचा वापर त्यास एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन अपघात होण्याची शक्यता अधिक असते. पी.एन.जी. पर्यावरणपूरक असल्याने एलपीजीपेक्षा सुरक्षित व किफायतशीरही आहे. एलपीजीच्या धोक्यांमुळे धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास सहकारी संस्था मर्या., आणि धोबीघाट समाजाने धोबीघाटातील थेट ग्राहकांसाठी स्वतंत्र पाईप गॅस जोडणीची मागणी केली आहे.
महालक्ष्मी धोबीघाट ही मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या ठिकाणच्या ऐतिहासिक वारसाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याने धोबीघाटवर पी.एन.जी. वितरण व जोडणी तसेच सुयोग्य उपकरणे आदींची उभारणी केली जात असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कामांसाठी महापालिकेच्या वतीने सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओशिपॅनिक इंजिनिअर्स अँड कन्सल्टंस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.