कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची अलिबागला स्पष्टोक्ती
अलिबाग : राज्यातील सर्व सोयाबीनची खरेदी होणार असल्याची स्पष्टोक्ती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी अलिबाग येथे केली. सोयाबीन खरेदी हा पणन विभागाचा विषय आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही; परंतु सोयाबीनची खरेदी सर्वत्र सुरू असून, काही ठिकाणी अडचणींमुळे खरेदी थांबली आहे, असे असले तरी सर्व सोयाबीन खरेदी केले जाईल, असे आपल्याला पणनमंत्र्यांनी सांगितल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
अलिबाग येथे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकारांशी ते बोलत होते. स्थानिक काजुपेक्षा आयात केलेला काजू स्वस्त पडतो, हे लक्षात घेऊन काजुवरील आयात कर वाढविण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारला सुचित करणार आहोत. नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केल्याबाबत गरज पडल्यास चौकशी केली जाईल.
खारेपाटात रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली जिताडा व्हिलेज ही बारगळलेली योजना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील. ही योजना राबविण्यात काही अडचणी येतात का, याची पडताळणी केली जाईल. जर अडचणी नसतील, तर ही योजना राबविण्यात आम्हाला काही अडचण येणार नाही. जिताडा मासे व्यवसायातून देशाला परकीय चलन मिळणार असेल, तर त्याचा नक्की विचार केला जाईल असेही कोकाटे म्हणाले.
कोकाटे यांनी पुढे सांगितले की, कोकणातील खारजमिनींची नोंद सातबारा उताऱ्यांवर नसल्याने या जमिनींवर राबविण्याच्या योजना किंवा उपाययोजना यासाठी आवश्यक तरतूद होत नाही. शिवाय या खारजमिनींत जी भातशेती होते, त्याचे नुकसान झाल्यास सरकारी मदत मिळत नाही. यासंदर्भात महसूल विभागाशी समन्वय साधून त्यावर शेतजमीन अशी नोंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही कोकाटे म्हणाले.