मुंबई : महानगरपालिकेच्या परिमंडळ सात अंतर्गत एकूण चार ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. परिमंडळ ७ अर्थात कांदिवली ते दहिसर भागांत आता फक्त नऊ श्री गणेश मूर्तींचे विसर्जन शिल्लक आहे. सर्व मूर्तींची उंची आदी बाबी लक्षात घेवून संबंधित कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. परिमंडळ ४ अंतर्गत गोरेगांव परिसरातील बांगूरनगर येथे ३० बाय ३० आकाराचा कृत्रिम तलाव आहे. पोलीस प्रशासनाच्या नियोजनानुसार तेथेही विसर्जनासाठी मूर्ती नेण्यात येणार आहेत, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे. कृपया श्री गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करावे. श्री गणेशोत्सव पर्यावरण पूरक होण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीला कृपया सहकार्य करावे,असेही आवाहन महापालिकेने केले आहे.
माघी गणेशोत्सव २०२५ अंतर्गत स्थापन श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीत होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या आहेत. श्री गणेश मूर्तींचे योग्यरित्या विसर्जन व्हावे, यासाठी आवश्यक तेथे कृत्रिम तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासमवेत मिळून मूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी मार्गांचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर, श्री गणेश मूर्तींचे महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे. माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होण्यासाठी सर्व श्री गणेश भक्तांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. माघी गणेशोत्सवाकरिता महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. स्थानिक सार्वजनिक मंडळे तसेच नागरिकांची मागणी लक्षात घेता या उपाययोजना तसेच सेवा-सुविधांची व्याप्ती देखील वाढवण्यात आली आहे.
कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई महानगरपालिकेने ६ जानेवारी २०२५ रोजी माघी गणेशोत्सव संदर्भात परिपत्रक प्रसारित केले. माघी गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या श्री गणेश मूर्तींची स्थापना करणार नाही, या अटीचे प्रामुख्याने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पालन करणे आवश्यक असेल. तसेच सर्व घरगुती गणेश मूर्ती देखील पर्यावरण पूरक साहित्यापासून घडविलेल्या असाव्यात. सर्व श्री गणेश मूर्तींचे विसर्जन स्वतःच्या घराच्या / गृह संकुलाच्या आवारात / बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावात करण्यात यावे, असे या परिपत्रकातून महानगरपालिकेने सूचित केले होते.
१ फेब्रुवारी २०२५ पासून माघी गणेशोत्सव २०२५ सुरू झाला. माननीय उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची हमी संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महानगरपालिकेकडे हमीपत्राच्या माध्यमातून दिली. त्याआधारे, अर्जांची यथायोग्य छाननी करून माघी गणेश मूर्तींची स्थापनेसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. परंतु, काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नैसर्गिक ठिकाणी श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. मूर्तींची उंची अधिक असल्याने नैसर्गिक विसर्जन स्थळांवर योग्यरितीने मूर्ती विसर्जन होईल, कृत्रिम तलावांची क्षमता पुरेशी नाही, असे या मंडळांचे म्हणणे होते.
Maghi Ganeshotsav : माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम
ही बाब लक्षात घेता उंच असलेल्या श्री गणेश मूर्तींचे देखील विसर्जन सुलभ, योग्यरितीने व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी, स्थानिक गरजेनुसार सोयींमध्ये अतिरिक्त वाढ केली. प्रामुख्याने पुरेशा संख्येने कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या तलावांची खोली वाढवली आहे. म्हणजेच, या कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेश मूर्तींचे विसर्जन सुयोग्य रीतीने होईल अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
Ganpati Visarjan 2025 : मुंबईतील गणपतींचे अखेर ११व्या दिवशी विसर्जन!
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या कृत्रिम तलावात १५ फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे; दहिसर स्पोर्टस् फाउंडेशन येथे कृत्रिम तलावात सहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे; कांदिवली (पूर्व) मध्ये महाराणा प्रताप उद्यान येथे सहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे, कदमवाडी मैदान येथे कृत्रिम तलावात १९ फूट उंचीपर्यंतच्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होऊ शकेल अशी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे.