Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीMaghi Ganeshotsav : माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम

Maghi Ganeshotsav : माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम

कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय गणेश मंडळांनी नाकारला

मुंबई : माघी गणेशोत्सवातील (Maghi Ganeshotsav) पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा तिढा अद्यापही कायम आहे. समुद्रामध्ये विसर्जनासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नाही. महापालिकेने कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचा पर्याय दिला आहे. पण १४ ते १५ फुटाच्या मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये होऊ शकत नाही, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे त्या मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे याबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

नुकताच माधी गणेशोत्सव पार पडला. या गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन समुद्रामध्ये करायला पालिका प्रशासनाने नकार दिलेला आहे. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने व्यवस्था केलेल्या कृत्रिम तलावामध्येच हे विसर्जन करावे अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे सोमवारी रात्री उशीरापर्यंत विसर्जनाबाबतचा तिढा कायम होता. मंगळवारी अकराव्या दिवशी सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून हा पेच कसा सोडवायचा याबाबत उशीरापर्यंत खलबते सुरू होती.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही मार्गदर्शक तत्वे योग्य ठरवली आहेत. त्यामुळे, माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना दिले होते. मात्र तरीही दीड दिवसांच्या व पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मुंबईत विविध ठिकाणी विशेषतः पश्चिम उपनगरात झाले. त्यामुळे शाडूची माती तयार करणाऱ्या मूर्तीकारांनी पालिकेकडे व पोलिसांकडे आक्षेप घेतले होते.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईतील गणपतींचे अखेर ११व्या दिवशी विसर्जन!

त्यानंतर सातव्या दिवशीच्या विसर्जनाला ७ फेब्रुवारी रोजी समुद्र किनाऱ्यांवर मूर्ती विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाने मंडळांना परवानगी दिली नाही. त्यामुळे बहुतांशी मंडळांच्या गणेशमूर्ती मंडळात परत पाठवाव्या लागल्या. मंडपांमध्ये या मूर्ती झाकून ठेवण्यात आल्या आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद पीओपीच्या मूर्तीकारांमध्ये व गणेशोत्सव मंडळांमध्ये उमटले आहेत.

रविवारी सकाळी राज्यभरातील पीओपी मूर्तीकारांच्या संघटनांची व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक लालबाग येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्य सरकारला या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी २४ तासांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी मंडळांचे प्रतिनिधी व पीओपी मूर्तीकारांचे प्रतिनिधी हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र ती बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे या विषयावर तोडगा निघू शकला नाही.

पालिका प्रशासनाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कृत्रिम तलाव बांधून दिला असून त्यात विसर्जन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाने मंडळांना दिले आहेत. मात्र हा कृत्रिम तलाव लहान असून १४ ते १५ फूटाच्या किमान पंधरा मूर्ती आहेत. त्यांचे विसर्जन या कृत्रिम तलावात होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.

कांदिवली परिसरातच सार्वजनिक गणेशमूर्ती मोठ्या संख्येने असून डहाणूकर वाडी येथील तलावात विसर्जन करण्याची परवानगी मंडळांनी मागितली होती. मात्र ती देखील पालिका व पोलिसांनी नाकारली आहे. त्यामुळे गणेशमंडळांसमोर पेच निर्माण झाला आहे.

११ फेब्रुवारीला जनआंदोलन उभे करून कांदिवलीतून मोठ्या प्रमाणावर मिरवणूका काढण्याचा इशारा पीओपी मूर्तीकारांनी व मंडळांनी दिला होता. मात्र सोमवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत निर्णय झाला नव्हता. पीओपी मूर्तीकारांच्या संघटनेने गणेशोत्सव मंडळांना सर्वतोपरी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

आता या सर्व मंडळांनी कांदिवली येथील हिंदुस्थान नाका येथे एकत्र सर्व गणेश मूर्ती आणून रात्री १० वाजता मालाड येथील मार्वे समुद्रकिनारी विसर्जन करण्याचे ठरवले आहे. सर्व गणेश मंडळांनी आपल्या एकीचे बळ काय असते ते दाखवून देऊ अशी भूमिका घेतली आहे.

तर अशा प्रकारे कोणी न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करायचे ठरवले तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशारा पोलिसांनी दिला आहे.

तर तिकडे चारकोपचा राजा गणेश उत्सव मंडळाने आम्ही नैसर्गिक विसर्जन करण्यावर ठाम आहोत आणि तशी परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे मागणी केली आहे. अजून चार-पाच दिवस आम्ही वाट पाहू अन्यथा आमचा गणपती वर्षभर आम्ही त्याच जागेवर बसवू असा निश्चय केला आहे. यामुळे गणेश मूर्ती विसर्जनाचा हा तिढा आणखी वाढतच चालला असून आता पालिका आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -