नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी(Delhi Assembly Election 2025) ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले असून शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होत आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी सकाळी मतमोजणी केंद्रावर पोहोचून मतमोजणी करणार आहेत.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. दिल्लीतील ६०.४२ टक्के मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक ६६.२५ टक्के आणि दक्षिण-पूर्वमध्ये सर्वात कमी ५६.१६ टक्के इतके मतदान झाले होते.
निवडणुकीनंतर जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसून आले. तर सातत्याने ३ वेळा दिल्लीची सत्ता उपभोगणाऱ्या आम आदमी पार्टीने एक्झिट पोल नाकारत सत्तेत कायम राहण्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा कौल नेमका कुणाला राहिल याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.