Thursday, October 23, 2025
Happy Diwali

Maghi Yatra : माघी यात्रेकरिता पंढरपूरात अडीच लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी

Maghi Yatra : माघी यात्रेकरिता पंढरपूरात अडीच लाखाहून अधिक भाविकांची मांदियाळी

पंढरपूर : माघी यात्रेच्या (Maghi Yatra) सोहळ्याकरिता अडीच लाखाहून अधिक भाविकांचे पंढरीत आगमन झाले आहे. माघी दशमी दिवशी शुक्रवारी (ता. ७) पहाटेपासूनच चंद्रभागा नदीस्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदीकिनारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. शुक्रवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सात नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली असून श्रींच्या दर्शना साठी १६ ते १८ तासांचा अवधी लागत आहे. माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह शेजारील तेलंगणा व कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांच्या गर्दीने ६५ एकर, चंद्रभागा नदीचे वाळवंट, श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला आहे.

दरम्यान शुक्रवारी दशमी दिवशी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. नदीस्नानानंतर भाविक श्री विठ्ठल पददर्शनासाठी गोपाळपूर रस्त्यालगतच्या पत्रा शेडमधील दर्शन रांगेत उभे राहत होते. दर्शनाची रांग सात नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती.

पत्रा शेड दर्शन रांगेतील हजारो भाविकांसाठी श्री विठ्ठल मंदिर समितीने दर्शन रांग परिसरामध्ये अन्नछत्र सुरू केले आहे. समितीच्या वतीने नवमी व दशमी दिवशी भाविकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले तर एकादशी दिवशी साबुदाणा खिचडीचे व चहाचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान शुक्रवारी श्री विठ्ठल दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले गजानन दत्तोबा कालिंग (रा. हलगा, ता. बेळगाव, जि. बेळगाव) बोलताना म्हणाले, गुरुवारी (ता.६) सायंकाळी सहा वाजता सात नंबरच्या पत्रा शेड दर्शन रांगेत होतो; सुमारे १८ तासांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले.

चंद्रभागा नदीच्या पैल तीरावरील भक्ति सागर (६५ एकर) मधील ४९७ प्लॉट्स पैकी ४४८ प्लॉटचे बुकिंग झाले आहे. त्या परिसरात दिंडीकरांनी उभारलेल्या तंबू व राहूट्या मध्ये सुमारे दीड लाखाहून अधिक भाविक मुक्कामी आहेत. या भाविकांना सोई सुविधा पुरवण्यासाठी तेथे एक आपत्कालीन मदत केंद्र उभारण्यात आले आहे. माघ एकादशीचा मुख्य सोहळा शनिवारी (ता.८) असून सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. या भाविकांसाठी गोपाळपूर पत्रा शेड पदस्पर्शदर्शनरांगेत ६ पत्राशेड उभारण्यात आले होते. मात्र, दर्शनरांगेतील भाविकांची गर्दी वाढली असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यासाठी यंदा प्रथमच अतिरिक्त २ तात्पुरत्या पत्राशेड नव्याने उभारण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >