मुंबई-गोवा महामार्गालगतची अतिक्रमणे जमीनदोस्त; माणगावात अतिक्रमण हटाव मोहिमेचा धूमधडाका सुरूच
माणगाव : मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) अनेक वर्ष रखडला आहे. रखडलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात तसेच वाहतूककोंडी नेहमीच होत असते. त्यातच माणगांव शहरात मुंबई-गोवा महामार्गालगत छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या टपऱ्या व दुकाने थाटली होती. माणगांव नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी माणगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली असून शुक्रवार (दि. ७) रोजी मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले अतिक्रण जमीनदोस्त केले आहे.
माणगांव शहर हे भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि हेच शहर सध्या वाहतूककोंडीचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार यादिवशी तर माणगांव शहरातून चालणे हे पादचारी नागरिक आणि वाहनचालकांना डोकेदुखी होऊन राहिले आहे. याविरुद्ध माणगांव मुंबई-गोवा हायवेलगत असणारी व्यापारी लोकांनी केलेली अतिक्रमणे मूलभूत कारणीभूत असल्याचे अधोरेखित करत माणगांव नगरपंचायतने या अतिक्रमनांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर ‘हातोडा’ कारवाईचे सत्र सुरू केले.
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, आदिती तटकरेंची माहिती
माणगांव शहरात अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामे करून महामार्ग व रस्ता काबीज केला होता. त्यामुळे सातत्याने वाहतूककोंडी माणगाव शहरात होत होती. नागरिकांना महामार्गावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत होते. याची दखल घेऊन नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरातील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येत आहेत.
पोलीस बंदोबस्तात शासकीय जागेवरील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. माणगाव पोलीस व वाहतूक पोलीस यांच्या सहाय्याने वाहतूक कोंडी सोडविण्यात आली. अतिक्रमण कारवाई सुरू असताना महामार्गावर बघ्यांची तोबा गर्दी झाली होती.
माणगावकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
अतिक्रमणांवर कारवाई करत असताना तेथील दुकानदार यांनी यावेळी संताप व्यक्त केला. तर काही दुकानदारांनी आमच्याकडे स्टे ऑर्डर असल्याचे यावेळी सांगितले. परंतु, नगर पंचायत मुध्याधिकारी संतोष माळी यांनी शांतपणे सर्वांना आवाहन केले. तुमच्याकडे कायदेशीर कागदपत्रे असल्यास ते दाखवा. अन्यथा शासकीय जागेवरील अतिक्रमण हे हटविण्यात येईलच असे सांगितले. अतिक्रमण तोडल्याने माणगावकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल अशी आशा असल्याने त्यांनी आता सुटेकचा श्वास घेतला आहे. भविष्याचा विचार करता रायगड जिल्ह्याचे विभाजन झाल्यास नवीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण हे माणगाव होऊ शकते. त्यामुळे माणगाव शहराच्या सर्वांगीण विकास होणे गरजेचे असल्याने शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त होणे गरजेचे आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
माणगाव शहरात मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी हा जटिल प्रश्न बनला होता. माणगाव शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यात येत असून काळवा रोड, बामणोली रोड कॉर्नर, मुंबई गोवा महामार्गावरील फॉरेस्ट कॉर्नर, जुने एस टी स्टँड येथे असलेले अतिक्रमण हटविण्यात येत आहेत. तसेच शहरातील सर्वच शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत. – संतोष माळी, मुख्याधिकारी नगर पंचायत माणगाव.