सोलापूर : पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात भाविकांची नेहमीच मोठी रांग लागलेली असते. अशातच उद्या पंढरपुरात माघ एकादशी यात्रा सुरु होणार आहे. दरवर्षी या यात्रेला दरवर्षी सुमारे ४ ते ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Pandharpur Maghi Yatra)
प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेला सिंधुदुर्गात थांबा द्यावा! – खासदार नारायण राणे
मिळालेल्या माहितीनुसार, माघी एकादशीनिमित्त भाविकांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी मंदिरात पुजांची संख्या कमी करून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध राहणार आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शन मंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दुपारी १२ ते २ व रात्री ७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू आहे. मंदिर समितीचे संकेतस्थळ, मोबाईल अॅप वरून श्रीचे लाईव्ह दर्शन उपलब्ध आहे. देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाइन देणगीसाठी क्यूआर कोड, आरटीजीएस, सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूम तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदीलाडू प्रसाद व त्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती केल्याची माहिती मनोज श्रोत्री यांनी दिली. (Pandharpur Maghi Yatra)