Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनामस्मरण, शरणागती आणि भगवत्प्राप्ती

नामस्मरण, शरणागती आणि भगवत्प्राप्ती

अध्यात्म – ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही, आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही. शरणागती म्हणजे, ‘मी कर्ता’ हा अभिमान नाहीसा होऊन, ‘सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे’ ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनांत ‘कृती’ आहे; म्हणजे ‘मी कर्ता’ या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही; शिवाय, स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत; म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वत:चे कर्तृत्व नसते, त्यामुळे ‘मी कर्ता’ ही जाणीव टिकू शकत नाही. ‘मी नामस्मरण करतो’ हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही, कारण नामाचे स्मरण ‘होत असते,’ ते ‘करू’ म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे.

क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे; म्हणजेच शरणागती ही सहज-साध्य वाटली पाहिजे. पण अनुभव तसा येत नाही. जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो. एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करील, पण अती हळू चालव म्हटले तर ते फार कठीण जाते. म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला ‘तू नुसता मला शरण ये’ असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार हे सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्माप्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले. याचा अर्थ हाच की, जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे, हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे. परंतु भगवंताचे याच्या उलट आहे. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे होय. तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय.

तात्पर्य: अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ति जन्म पावते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -