मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. करूणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केले आहेत. त्यासोबतच न्यायालयाने करूणा मुंडे यांना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आताच धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. यादरम्यान आता कोर्टाने त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवत धनंजय मुंडेंना दणका दिला आहे.
न्यायालयाचे आभार मानते, आज सत्याचा विजय झालेला आहे. लोकांना वाटते की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. पण मला न्याय भेटलेला आहे. याआधीपण औरंगाबाद न्यायालयामध्येही माझ्या बाजूने निकाल लागला होता. न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मला आणि माझ्या दोन मुलांना प्रत्येकी ५ लाखांप्रमाणे १५ लाखांची मागणी केली होती. मात्र आम्हाला २ लाखांची पोटगी मिळाली आहे. या मागणीसाठी मी परत हाय कोर्टामध्ये जाणार असल्याचे करूणा शर्मा यांनी म्हटले आहे.
मला दोनवेळेस जेलमध्ये ठेवले गेले. येरवडा जेलमध्ये ४५ दिवस आणि बीडमध्ये १६ दिवस ठेवले होते. कलेक्टरच्या केबिनमध्ये मला वाल्मिक कराडच्या गुंडांनी मारहाण केली. माझी गाडी फोडली. महिलांना खूप त्रास दिला जातो. गेली तीन वर्ष मी यासाठी लढा देत आहे. अशा परिस्थितीत हा लढा माझ्यासाठी सोपा नव्हता. खूप-खूप कठीण होता हा लढा माझ्यासाठी. खूप मोठमोठे वकील माझ्या वकिलांच्या समोर युक्तिवाद करण्यासाठी उभे होते. त्यामुळे मी माझ्या वकिलांचे खूप आभार मानते.
चुकीचे वार्ताकंन न करण्याची माध्यमांना विनंती
धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका मांडताना अॅड. सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुध्दा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार व अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकन पासून दूर रहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम कर्मिना याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन अॅड. सायली सावंत यांनी केले आहे.
मुलांने घेतली बापाची बाजू
- हे सगळे सुरु असताना करुणा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सीशिव मुंडे याने एक इन्स्टाग्राम पोस्ट केली. यामध्ये त्याने वडील धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.
- सीशिव मुंडे म्हणतो, माझे वडील माझा आणि बहिणीचा २०२० पासून सांभाळ करतात. माझी आईच उलट आमचा छळ करते. आईने वडिलांना मारहाण केल्यामुळे वडील घर सोडून निघून गेले. आईला कसलीही आर्थिक विवंचना नाही, तिने घराचे हप्ते थकवलेले आहेत.
करुणा मुंडे म्हणाल्या की, माझ्या मुलांना सतत धनंजय मुंडे फोन करुन दबाव आणत आहेत. त्यांना कसे बोलले पाहिजे, हे शिकवले जात आहे. मी गप्प बसावे, असे माझ्या नवऱ्याला वाटते. मी रखेल म्हणून किंवा लिव्ह-इनच्या कागदांवर सही केली तर सगळ्यांनाच चांगले आहे. मीडिया ट्रायल आणि २०२१ पासून सुरु असलेला वाद मुलांना नकोय. मुलांची मानसिक स्थिती समजून घ्या, ते खूप लहान आहेत. तीन-चार वर्षांपासून ते सहन करीत आहे. काल बापाच्या डोळ्याचे ऑपरेशन झालेले असल्याने तो भावनिक झाला आहे. माझ्याच मुलांना माझ्याविरोधात भडकावले जात आहे. माझ्याच घरात परके केले जात आहे. काहीही झाले तरी मी रखेल म्हणून राहणार नाही, असा संताप करुणा मुंडेंनी व्यक्त केला.