Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पुण्याहून मुंबईला येऊन केली आत्महत्या

पुण्याहून मुंबईला येऊन केली आत्महत्या
मुंबई : एका महिलेने पुण्याहून मुंबईत येऊन आत्महत्या केली. या महिलेने मुलुंडमधील एका सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील घरातून उडी मारुन जीवन संपवले. आत्महत्या करणारी महिला ५३ वर्षांची होती. या महिलेला मधुमेह, हृदयविकार आणि डोळ्यांशी संबंधित समस्या होत्या.



मूळच्या पुण्यातील दौंडच्या सुनिता येवले (५३) मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे हैराण झालेल्या सुनिता मधुमेहावरील उपचाराच्या निमित्ताने मुलुंड येथे बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. वाढत्या आरोग्य समस्यांमुळे त्रस्त असलेल्या सुनिता यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.



सुनिता मागील २७ महिन्यांपासून मधुमेहाने त्रस्त होत्या. त्यांना दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्या डोळ्यांच्या आजाराशीही झुंज देत होत्या. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात सुनिता यांच्यावर उपचार होणार होते. उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे.



सुनिता यांनी सातव्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुनिता यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी पोलिसांनी सुनिता यांची बहीण, पती आणि मुलाचे जबाब नोंदवले आहेत. प्रदीर्घ आजारपणामुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होत्या, त्यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment