Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या

शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या
शिर्डी : शिर्डीत एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या. यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थानच्या सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर शिर्डीतील श्रीकृष्ण नगरचा कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. एकाच रात्री घडलेल्या या तीन घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणांची कसून चौकशी सुरू केली आहे.



ड्युटीवर जात असताना साई संस्थानचे कर्मचारी असलेल्या सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ या दोघांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. सुभाष साहेबराव घोडे यांची कर्डोबा नगर चौक परिसरात तर नितीन कुष्णा शेजुळ यांची साकुरी शिव परिसरात चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. या व्यतिरिक्त शिर्डीतील श्रीकृष्ण नगर भागात राहणाऱ्या कृष्णा देहरकर नावाच्या तरुणावर चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कृष्णा देहरकरवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.



शिर्डी संस्थानमध्ये दररोज हजारो नागरिक मोफत अन्नछत्रात जेवतात. या व्यवस्थेचा श्रद्धेने लाभ घेणारे जसे आहेत तसेच नोकरी - व्यवसाय न करता फुकटात जेवणारे पण वाढत आहेत. फुकटात जेवायचे आणि दिवसभर नशा करायची असे प्रकार करणाऱ्यांची संख्या शिर्डीत हळू हळू वाढत आहे. रात्री तीन जणांवर चाकू हल्ले झाले. हे हल्ले एकाच व्यक्तीने केले की एक पेक्षा जास्त व्यक्तींनी केले याचा तपास सुरू आहे. हल्लेखोर नशा करणाऱ्यांपैकी असण्याची शक्यता जास्त आहे. व्हाईटनरची नशा करणारे रात्री - अपरात्री संधी साधून चाकूचा धाक दाखवतात आणि लुबाडतात. विरोध केला तर हल्ला करतात. ताज्या घटनांमध्ये अशी नशा करणाऱ्यांपैकी कोणाचा तरी समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही; असे माजी खासदार सुजय विखे - पाटील म्हणाले. पोलिसांनी चाकू हल्ला प्रकरणात तपास करुन कारवाई करावी. तसेच शिर्डीतील नशाबाजांचा बंदोबस्त करावा. प्रसादालयात नशाबाजांच्या प्रवेशालाच बंदी घालावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Comments
Add Comment