अहमदाबाद : एकेकाळी स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु अशी आसाराम बापूची ओळख होती. अनेकजण संत आसाराम बापू म्हणजे देवाचे रुप असे म्हणत होते. याच काळात आसाराम आणि त्याच्या मुलावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या वय आणि तब्येतीचे कारण देऊन जामिनावर तुरुंगाबाहेर आलेला आसाराम आता वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
पंतप्रधान मोदींचा महाकुंभ दौरा होऊ शकतो रद्द, ५ फेब्रुवारीला जाणार होते प्रयागराजला
तब्बल अकरा वर्ष तुरुंगात काढल्यानंतर आसाराम बाहेर आला. काही काळ जोधपूरच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर आसाराम अहमदाबादच्या आश्रमात विश्रांतीसाठी आला आहे. अहमदाबादमध्ये आसारामवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जामिनावर असताच्या काळात तब्येत सुधारावी यासाठी आवश्यक ती काळजी घेत असलेला आसाराम वेबसीरिजमुळे नव्या चिंतेने ग्रासला आहे.
आसारामवरील ‘सेंट ऑर सिनर ?’ अर्थात ‘संत की पापी ?’ नावाच्या वेबसरिजमध्ये आसाराम ही व्यक्ती कशी लोकप्रिय झाली ? पुढे आरोप कसे होत गेले ? आसारामच्या अडचणी कशा प्रकारे वाढल्या ? न्यायालयात काय झाले ? आसाराम कोणत्या कारणामुळे दोषी ठरला ? आसारामला न्यायालयाने दिलेली शिक्षा अशा अनेक मुद्यांना वेबसीरिजमध्ये स्पर्श करण्यात आला आहे. या वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी आसारामच्यावतीने त्याच्या वकिलाने केली आहे. वेबसीरिज विरोधात कायदेशीर लढा लढण्याची तयारी आसारामने सुरू केली आहे.
याआधी आसाराम विरोधात न्यायालयात उभ्या असलेल्या पीसी सोलंकी नावाच्या वकिलावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेला ‘बस एक बंदा ही काफी है’ हा चित्रपट मे २०२३ मध्ये आला. या चित्रपटाला आसाराम बापू न्यासाच्या (ट्रस्ट) वकिलाने विरोध केला होता. उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास नकार दिला. आसाराम खटल्याशी संबंधित आयपीएस अजयपाल लांबा आणि संजीव माथुर यांनी लिहिलेल्या ‘गनिंग फॉर द गॉडमॅन’ पुस्तकालाही आसारामकडून विरोध करण्यात आला होता. पण दिल्ली उच्च न्यायालयाने या पुस्तकाव बंदी घालण्यास नकार दिला होता. आता आसारामशी संबंधित वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात आहे. आधीचे न्यायालयीन घटनाक्रम बघता, वेबसीरिजवर बंदी येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. यासाठी आसारामच्या समर्थकांमध्ये संदेश पसरवून वेबसीरिज बघितली जाऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत.