Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजठाणे

तिसऱ्या मजल्यावरुन कोसळला दोन वर्षांचा चिमुरडा

तिसऱ्या मजल्यावरुन कोसळला दोन वर्षांचा चिमुरडा
डोंबिवली : एका तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन दोन वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. ही धक्कादायक घटना डोंबिवलीतील देवीचा पाडा येथे घडली. सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला.





चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडत असल्याचे लक्षात येताच भावेश म्हात्रेने त्याला हवेत झेलण्यासाठी धाव घेतली. भावेश याच इमारतीत ग्राहकाला घर दाखवण्यासाठी आला होता. घर दाखवून झाल्यावर तो ग्राहकासोबत बाहेर पडत होता. सहज इमारतीकडे बघत आवारातून बाहेर पडत असताना भावेशला चिमुरडा पडत असल्याचे लक्षात आले आणि त्याने धाव घेतली. अखेर चिमुरडा भावेशच्या हाताला लागून नंतर खाली जमिनीवर पडला. भावेशने प्रसंगावधान राखत पाय पटकन पुढे केले आणि चिमुरड्याला पायावर झेलण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिमुरड्याला मोठी दुखापत झाली नाही. आजूबाजूच्या नागरिकांसह आईवडिलांनी तातडीने चिमुरड्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन चिमुरडा सुखरुप असल्याचे सांगितल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.



हाती आलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात राहणारा भावेश म्हात्रे हा ३५ वर्षीय युवक घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तो शनिवार २५ जानेवारी रोजी दुपारी अनुराज इमारतीत ग्राहकाला घर दाखवण्यासाठी गेला होता. घर दाखवून इमारती बाहेर येत असताना याच इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील घरातला चिमुरडा खाली पडत असल्याचे लक्षात आले आणि भावेशने धाव घेतली.



ज्या घरातून चिमुरडा पडला त्या घरात रंगकाम सुरू होते. रंगकामासाठी खिडकीच्या काचा आणि इतर सामान काढून ठेवले होते. यामुळे निर्माण झालेल्या मोकळ्या जागेतून चिमुरडा खेळता खेळता खाली पडला. पण भावेश धावून आला आणि मोठे संकट टळले.

भावेश देवासारखा धावून आला आणि चिमुरड्याच्या जीवावरचे मोठे संकट टळले. चिमुरड्याच्या बाबतीत 'देव तारी त्याला कोण मारी' असाच प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.
Comments
Add Comment