रायगड : कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांचा गौरव होणार आहे. संजय दराडे यांनी पदभार हाती घेतल्यापासून कोकण परिक्षेत्रात कायदा – सुव्यवस्था नियंत्रणात आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई होत आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
संजय दराडे हे मूळचे नाशिकचे आहेत. ते २००५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने मार्ग काढत त्यांनी प्रशासकीय सेवेत यश मिळवले. संजय दराडे यांनी पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. पुढे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलाखतीत यशस्वी झाले.
आयपीएस अधिकारी म्हणून संजय दराडे यांनी कोकण विभागाची सूत्रं हाती घेतली. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः भेटी दिल्या. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकाऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले. महिलांवरील अत्याचारांबाबत असलेल्या तक्रारींवर २४ तासांच्या आत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात काही हत्या प्रकरणं घडली आहेत. यातील बहुतांश हत्या प्रकरणातही संबंधित आरोपीला शोधून अटक करणे आणि त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करणे ही कामं संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात झपाट्याने सुरू आहेत. दबावाला बळी न पडता धडाकेबाज कारवाई ही संजय दराडेंची विशेष कामगिरी आहे.
दराडेंनी २०१७ मध्ये नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक असताना उत्तर प्रदेशातून येणारा अवैध शस्त्रसाठा जप्त केला होता. आठ जणांची आंतरराज्य टोळी त्यांनी जेरबंद केली होती. कोकण परिक्षेत्रात जिल्हा पोलीस ठाण्यात सोशल सायबर क्राइम लॅब सुरू करण्यासाठी ते काम करत आहेत. या कार्याचीही सरकारी पातळीवर दखल घेण्यात आली आहे.