मुंबई : भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सातत्याने अपयशी होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ रणजी स्पर्धेतही अपयश रोहितची पाठ सोडताना दिसत नाही. मुंबईत वांद्रे येथे असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर हा रणजी ट्रॉफीतील कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात रोहितने दोन डावात मिळून ३१ धावा केल्या. पहिल्या डावात फक्त तीन धावा करणारा रोहित दुसऱ्या डावात २८ धावा करुन बाद झाला. रोहितने तीन षटकार आणि दोन चौकार मारुन छान सुरुवात केली. पण ३५ चेंडूत २८ धावा करुन तो युधवीर सिंगच्या चेंडूवर आबिद मुश्ताककडे झेल देऊन परतला.
Rohit Sharma : रोहित शर्मा पुन्हा फॉर्ममध्ये, एक षटकारसह दोन चौकार झळकावले
रोहित शर्माने २०२४ मध्ये कसोटी क्रिकेट या प्रकारात एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. पण अनेक सामन्यात तो अपयशी ठरला आहे. रणजी क्रिकेटमध्ये रोहितचा खेळ सुधारेल अशी शक्यता वाटत होती. पण प्रदीर्घ काळानंतर रणजी खेळत असलेला रोहित शर्मा पहिल्या सामन्यात फलंदाज म्हणून अपयशी ठरला. यामुळे रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेत नाही ? या चर्चेला उधाण आले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या डावात ५२ धावा केल्या. यानंतर अद्याप त्याला अर्धशतक करणेही जमलेले नाही. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रमुख फलंदाज आहे. यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. पण मागील काही सामन्यांमध्ये रोहितचे अपयश ठळकपणे दिसले आहे. यामुळे रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रोहित शर्माची २०२४ मधील २० डावांतील कामगिरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ३ आणि ९ धावा – डिसेंबर २०२४ – मेलबर्न
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १० धावा – डिसेंबर २०२४ – ब्रिस्बेन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ३ आणि ६ धावा – अॅडलेड
भारत विरुद्ध न्यूझीलंड – १८ आणि ११ धावा – नोव्हेंबर २०२४ – मुंबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड – शून्य आणि ८ धावा – ऑक्टोबर २०२४ – पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २ आणि ५२ धावा – ऑक्टोबर २०२४ – बंगळुरू
भारत विरुद्ध बांगलादेश – २३ आणि ८ धावा – सप्टेंबर २०२४ – कानपूर
भारत विरुद्ध बांगलादेश – ६ आणि ५ धावा – सप्टेंबर २०२४ – चेन्नई
भारत विरुद्ध इंग्लंड – १०३ धावा – मार्च २०२४ – धर्मशाळा (धरमशाला)
भारत विरुद्ध इंग्लंड – २ आणि ५५ धावा – फेब्रुवारी २०२४ – रांची
रणजी ट्रॉफी स्पर्धा, जानेवारी २०२५
मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर
नाणेफेक जिंकून मुंबईचा फलंदाजीचा निर्णय
मुंबई पहिल्या डावात सर्वबाद १२० धावा
जम्मू काश्मीर पहिल्या डावात सर्वबाद २०६ धावा
मुंबई दुसऱ्या डावात ७ बाद २७४ धावा
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
शार्दुल ठाकूर नाबाद ११३ धावा
तनुष कोटिअन नाबाद ५८ धावा