Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Bank : मुंबई बँकेच्या सहकार संकुलासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करणार

Mumbai Bank : मुंबई बँकेच्या सहकार संकुलासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक स्वयंपुनर्विकास प्रकल्पांसाठी मुंबई बँकेला दीड हजार कोटी देणार

सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा

मुंबई बँकेच्या स्वयंपुनर्विकास संकल्पनेची संपूर्ण भारतात चर्चा होईल- पंकज भोयर

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे (Mumbai Bank) स्वयंपुनर्विकासासाठी १६०० गृहनिर्माण संस्थांनी संपर्क साधला असून आतापर्यंत १४ प्रकल्पांना २१८ कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी ४ प्रकल्प पूर्ण होऊन त्यांना घराचा ताबा देखील देण्यात आला आहे. बँकेला आर्थिक मर्यादा असल्याने मुंबई बँकेला पतपुरवठा करावा, अशी विनंती दरेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली आहे.

स्वयंपुनर्विकासातील अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात मुंबई बँकेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई जिल्हा सहकारी हैसिंग फेडरेशन व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राज्य बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ टी.कांबळे, संचालक विठ्ठलराव भोसले, नितीन बनकर, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैश्यंपायन, वित्त विभागाचे सहसचिव डॉ.माधव वीर, म्हाडाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वंदना सुर्यवंशी, म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता माधव सानप, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव दीपक शेलार, गृहनिर्माण विभागाचे कक्ष अधिकारी नितीन फिरंगे, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक एस. सी. सुर्वे, बँकेचे प्रकल्प सल्लागार हर्षल मोरे आणि स्वयंपुनर्विकास पूर्ण झालेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ. दरेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बँकेने सुरु केलेली स्वयंपुनर्विकास योजना ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना आहे. मुंबई बँकेने राबवलेला नंददीप सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होऊन फ्लॅटधारकांना किल्ल्या हातात देताना त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रु खूप काही सांगून जातात. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आतापर्यंत या योजनेला सर्वबाबतीत मदत केली आहे.

रोज एक फूटणार, उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश; हिंमत असेल तर पक्ष प्रवेश रोखून दाखवा

दरेकर असेही म्हणाले की, मुंबई बँकेकडे १६०० गृहनिर्माण संस्थांनी संपर्क साधला असून आतापर्यंत २१८ कोटी रुपये या प्रकल्पांसाठी दिले आहेत. बँकेला आर्थिक मर्यादा असल्याने राज्य सहकारी बँकेने मुंबई बँकेला पतपुरवठा करावा.

मुंबई बँकेकडून मुंबईतील सायन प्रतिक्षानगर येथे प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सर्व सुविधायुक्त सहकार संकुलाची उभारणी केली जात आहे. हे संकुल सहकार क्षेत्रातील सर्व संस्थांसाठी, कार्यकर्त्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशीही विनंती दरेकर यांनी त्यांच्या भाषणात केली.

यावेळी बोलताना राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर यांनी आश्वासन दिले की, राज्य सहकारी बँक नेहमीच अशा उपक्रमांना मदत करण्याची भूमिका घेत असते. राज्य बँकेकडून गृहनिर्माणासाठी असलेल्या निधीतून १५०० कोटी रुपये आम्ही निश्चितपणे देऊ. दोन-तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी कन्सोर्शियम करण्याची प्रक्रिया करावी.

बैठकीत अध्यक्षीय भाषण करताना सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, प्रवीण दरेकर हे नाव सहकार क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांच्यामुळे ‍मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मला जिल्हा बँकेत येण्याची संधी मिळाली आहे. प्रवीण दरेकर यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या स्वयंपुनर्विकास योजनेची माहिती घेतल्यानंतर साडेतीनशे चौरस फुटाची घरे असणाऱ्यांना ९०० ते १४०० स्क्वेअर फुटाची घरे मिळाल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. खरोखरच ही योजना अतिशय चांगली योजना आहे. ज्या सोसायट्यांचा पुनर्विकास पूर्ण झाला त्यांचे पदाधिकारीही या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित आहेत. हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष आहे. मुंबई बँकेने किमान एक हजार संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवावे, गतीने ते पूर्ण करु, सरकार या योजनेच्या पाठीशी निश्चित ठामपणे उभे आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या योजनेबाबत सकारात्मक आहेत. मला विश्वास आहे की, एक हजार प्रकल्प पूर्ण केले तर प्रवीण दरेकर यांच्या प्रेरणेतून तयार झालेली ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात नावारुपाला येईल. मुंबई बँकेकडून उभारण्यात येणाऱ्या सहकार संकुलासाठी सरकार ५० कोटी रुपयांची तरतूद करील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -