Saturday, May 24, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मुंबई - ठाण्यात रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होणार ?

मुंबई - ठाण्यात रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होणार ?
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये (Mumbai Metropolitan Region) रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. राज्याच्या परिवहन विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ सुचवली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांवरुन २६ रुपयांवर जाऊन पोहोचेल तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांवरुन ३१ रुपयांवर जाऊन पोहोचेल. याआधी रिक्षासाठी २३ आणि टॅक्सीसाठी २८ रुपये एवढे किमान भाडे निश्चित करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२२ मध्ये झाला होता.



प्रवासी संघटनांचा प्रस्तावीत भाडेवाढीला विरोध आहे तर रिक्षा आणि टॅक्सीच्या चालक - मालक संघटनांनी भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगितले. इंधनाच्या दरात होत असलेली वाढ, वाहनाच्या देखभालीसाठी होणाऱ्या खर्चात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे भाडेवाढ आवश्यक असे रिक्षा आणि टॅक्सीच्या चालक - मालक संघटनांचे म्हणणे आहे. वाढत्या खर्चांचा बोजा वाहन चालक - मालक यांच्यावर पडू नये यासाठी खटुआ समितीने नियमित कालावधीच्या अंतराने परिस्थितीचा आढावा घेऊन माफक दरवाढ करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीनुसार घेतलेल्या आढाव्यात २ रुपये ६० अशी दरवाढ सुचवण्यात आली आणि व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे म्हणून नंतर तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव सादर झाला आहे. यामुळे ही दरवाढ करावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सीच्या चालक - मालक संघटनांनी केली आहे. तर दरवाढीपेक्षा आधी उत्तम सेवा द्या आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मीटरनुसार सेवा द्या अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई महानगर क्षेत्रात जास्तीत जास्त ठिकाणी शेअर रिक्षा स्टँड, शेअर टॅक्सी स्टँड सुरू करावे; अशीही मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.



बेस्ट (Brihanmumbai Electric Supply and Transport - BEST) आणि एनएमएमटी (Navi Mumbai Municipal Transport - NMMT) पाठोपाठ आता टीएमटी (Thane Municipal Transport - TMT) एसी बसच्या भाड्यात कपात करण्याचा विचार करत आहे. सध्या बेस्टच्या साध्या बसचे किमान भाडे पाच रुपये आणि एसी बसचे किमान भाडे सहा रुपये आहे. एनएमएमटीच्या साध्या बसचे किमान भाडे सात रुपये आणि एसी बसचे किमान भाडे दहा रुपये आहे. याउलट टीएमटीच्या साध्या बसचे किमान भाडे दहा रुपये आणि एसी बसचे किमान भाडे वीस रुपये आहे. यामुळे प्रवासी संख्येवर होत असलेला परिणाम कमी व्हावा यासाठी टीएमटी दर कपातीचा विचार करत आहे.
Comments
Add Comment