कोटा : स्पर्धा परीक्षांच्या खासगी कोचिंग क्लासचे केंद्र अशी राजस्थानमधील कोटा शहराची ओळख आहे. या कोटा शहरात एका दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यंदा जानेवारी महिन्यात अवघ्या २२ दिवसांत कोटामध्ये सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ताजी घटना जेईई मेन्स परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. तो एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकत होता. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
कोटामधील आत्महत्यांमुळे आता कोचिंग क्लासचा कारभार कसा सुरू आहे याच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. चौकशीसाठी कोटा प्रशासनावरील नागरिकांचा दबाव वाढू लागला आहे.
Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोटातील जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावीर नगर फर्स्ट भागात जेईई मेन्स परीक्षेची तयारी करत असलेल्या खासगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. याआधी जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका गुजराती विद्यार्थिनीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीने गळफास लावून घेतला आणि जीवन संपवले. ही विद्यार्थिनी गुजरातमधील अहमदाबादची होती. ती सहा महिन्यांपूर्वी कोटामध्ये आली होती. राजीव नगरमधील एका हॉस्टेलमध्ये राहून ती नीट परीक्षेची तयारी करत होती. विद्यार्थिनीचा मृतदेह हॉस्टेलमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांनी विद्यार्थिनीच्या आत्महत्येचा तपास सुरू केला आणि काही तासांतच जेईई मेन्स परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त आले. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षा सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणारा विद्यार्थी आसाममधील नागावचा रहिवासी आहे.
कोटामध्ये १ जानेवारी २०२५ ते २२ जानेवारी २०२५ दरम्यान सहा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
पहिली आत्महत्या ८ जानेवारी हरियाणातील महेंद्रगडचा नीरज
दुसरी आत्महत्या ९ जानेवारी मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातील अभिषेक लोधा
तिसरी आत्महत्या १५ जानेवारी ओडिशातील अभिजीत गिरी
चौथी आत्महत्या १८ जानेवारी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील मनन जैन
पाचवी आत्महत्या २२ जानेवारी गुजरातमधील अहमदाबादची अफ्शा शेख
सहावी आत्महत्या २२ जानेवारी आसाममधील नागावचा पराग