मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर रोहित शर्मा देखील कर्णधार म्हणून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही. पाकिस्तान या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे पण भारताचे सामने दुबईत होणार आहेत. त्यांनतर आता पुन्हा एकदा बीसीसीआयने मोठं पाऊल उचललं आहे.साधारणपणे सर्व संघांच्या जर्सीवर या स्पर्धेचे यजमान देशाचे नाव असते, मात्र भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसणार आहे. असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्घाटन सोहळा आणि कॅप्टन्स डे १६ किंवा १७ फेब्रुवारीला होणार आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानमध्ये पाठवण्यासही नकार दिला होता. यावर पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने बीसीसीआयवर क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप केला आहे.अशातचं आता भारतीय संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापलं जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडे यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असल्याने इतर देशांच्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार आहे. पीसीबीने याप्रकरणी भारत आणि बीसीसीआयवर आरोप केले आहेत.
E-Water Taxi : मुंबईच्या समुद्रातून आता ‘ई-वॉटर टॅक्सी’ धावणार!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) एका अधिकाऱ्याने सांगितले की, “बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे जे खेळासाठी चांगले नाही. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन समारंभाला त्यांचा कर्णधारला (रोहित शर्मा) पाकिस्तानला पाठवले नाही आणि आता पाकिस्तानचे नाव जर्सीवर (भारतीय क्रिकेट संघ) छापले जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही आयसीसीकडून आशा करतो की ते असे होऊ देणार नाहीत आणि पाकिस्तानला पाठिंबा देतील.”भारताने २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतात आला आणि आपले सर्व सामने येथे खेळले. पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचे नाव होते. याआधीही जेव्हा भारताने आयसीसी स्पर्धांचे आयोजन केले होते तेव्हा पाकिस्तानच्या जर्सीवर भारत असे लिहिले होते. मात्र, बीसीसीआयला आपल्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नको आहे. आता या मुद्द्यावर पाकिस्तानने आयसीसीकडे धाव घेतली आहे.