मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता देशातील पहिलीवहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीने मुंबईकरांची उत्सुकता ताणून धरली आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (MDL) आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा पुढील महिन्यापासून नियमितपणे सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. या नवीन वाहतूक मार्गाच्या पर्यायाने मुंबईला भेडसावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. या निर्णयाचे तमाम मुंबईकरांनी स्वागत केले आहे. जलमार्गांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हटले जात आहे. यापूर्वीही वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यायाने महागड्या तिकीट दरांमुळे या सेवांना मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही.
Bhandup Update : ट्रायडेंट पाठोपाठ भांडुपच्या मॉलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह!
सुरवातीला या ई – वॉटर टॅक्सीचे मॉडेल परदेशातून आणण्याचे ठरले होते. मात्र नंतर माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (एमडीए) स्वत:च इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच, इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची निर्मितीही यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीचे स्वरूप कसे असेल ?
ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी १३.२७ मीटर लांब आणि ३.०५ मीटर रुंद आहे. तसेच या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमधून २५ प्रवाशी प्रवास करू शकतात. यामध्ये ६४ किलोवॅटची बॅटरी आहे. ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी एकदा चार्जिंग केल्यावर ४ तास चालू शकते. या टॅक्सीचा वेग १४ नॉट्सपर्यंत असणार आहे. याशिवाय, या ई – वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा (Air-conditioned facility) उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.
दरम्यान आता मुंबईकरांचा या वाहतुकीला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल