नोंदणी प्रमाणपत्राशिवाय कोणतीही परवानगी नसल्याचे उघड
राजापूर : राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी भूमिकाच कारणीभूत असल्याची माहिती आता पुढे आली आहे. केवळ धर्मादाय आयुक्तांकडे असलेल्या संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त मदरसा चालविणेबाबत व अन्य बाबींबाबत अन्य कोणतीही परवानगी संबधित मदरसा चालकांकडे नसल्याची बाब उघड झाली आहे. असे असतानाही गेली दिड ते दोन वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी सदरचा अनधिकृत मदरसा बंद करण्याची वारंवार मागणी करूनही स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत अशा प्रकारे या ठिकाणी अनधिकृत मदरसा चालविण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांतुन होत आहे.
तर धर्मादाय आयुक्तांकडील या संस्थेची नोंदणी प्रस्तावात पत्ता राजापूर शहरातील आणि मदरसा सुरू धोपेश्वर पन्हळे परिसरात हा काय प्रकार असा सवाल उपस्थित केला जात असून या मदरशात परराज्यातील मुले असून त्यांची संख्या ६० इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारे राजापुरात येऊन परराज्यातील मुलांनी या मदरशामध्ये शिक्षण घेण्याचा हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.
मौजे पन्हळे तर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत तसेच धार्मिक तेढ वाढवणारा विषय असून सदरहु मदरसा कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.यापुर्वीच्या प्रशासनाच्या आदेशाना न जुमानता हा अनधिकृत मदरसा अद्याप सुरुच असल्याने २६ जानेवारी २०२५ पासुन सदर अनधिकृत मदरसा बंद होईपर्यंत साखळी उपोषण छेडण्याचा ईशारा पन्हळे तर्फ राजापूरच्या ग्रामस्थानी प्रशासनाला दिला आहे. याबाबतचे एक निवेदन स्थानिक ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांसह राजापूर तहसिलदाराना सादर केले आहे .
त्यामुळे राजापुरातील या अनधिकृत मदरशाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात प्रशासनाचे बोटचेपे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांतुन होत आहे. दरम्यान या मदरशा संचालकांकडे मदरशा चालवण्याबाबत कोणतीही परवानगी वा दस्तऐवज नसल्याची बाब पुढे आली आहे. केवळ धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र असून या नोंदणी प्रमाणपत्रावर संस्थेचा पत्ता राजापूर शहरातील असून प्रत्यक्षात मदरशाचे कामकाज हे पन्हळे गावातुन चालविले जात असल्याचा अजबच प्रकार पहावयास मिळत आहे. मदरशा संचालकांकडून नेहमी बंद करण्याच्या आदेशाप्रसंगी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांचे नुकसान होऊ नये असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. मात्र या ठिकाणी असणारे व शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे परराज्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.
स्थानिक केवळ एक ते दोन मुले असून परराज्यातील या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ६० असल्याचे पुढे आले आहे. या परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अनधिकृत मदरशा चालविण्याचा एवढा अट्टाहास या संस्थेकडून का केला जात आहे असा सवाल स्थानिकांतुन उपस्थित केला जात आहे.
नोंदणी प्रमाणपत्राशिवाय अन्य कोणतीही परवानगी नाही-तहसीलदार विकास गंबरे या मदरशा संचालकांकडे संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त अन्य कोणताही परवाना वा दस्तऐवज नसल्याची माहिती खुद्द राजापूर तसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे. या मदरशातील विद्यार्थी संख्या, त्यांचे वास्तव्य तपासण्याबाबत पोलीस प्रशासनाला सुचना देण्यात आल्याचेही गंबरे यांनी सांगितले. सदरची जागा ही संस्थेच्या नावे खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव संबधितांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेला असल्याचेही गंबरे यांनी सांगितले. तर या मदरशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतचा अहवालही सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले.