महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक २० डिसेंबर २०२४ च्या शासन परिपत्रकानुसार ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम १ ते १५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आला. शासन परिपत्रकानुसार हा उपक्रम आपल्या राज्यातील महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये व विद्यापीठे या स्तरावर राबविण्यात आला. यात राज्यातील तरुणाई पुस्तक वाचनाकडे आकर्षित होण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मात्र हे आधी व्हायला पाहिजे होते.
रवींद्र तांबे
सध्या बरीच वाचनालये वाचक वर्गांची वाट पाहत असताना दिसतात. तेव्हा विद्यार्थी तसेच नागरिक वाचनालयाचे सभासद जरी असले तरी किमान आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा आपल्या सवडीने वाचनालयात जावे,तर विद्यार्थ्यांनी नियमित आपल्या वेळेनुसार वाचनालयात गेले पाहिजे. असे जर झाले असते, तर आज शासनाला राज्यात वाचन संकल्प करावा लागला नसता. शासन परिपत्रक निर्गमित झाल्यानंतर वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यासाठी काही महाविद्यालयाअंतर्गत समिती स्थापन करण्यात आली. ग्रंथालयातील सेवकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यासाठी ग्रंथालयाची साफसफाई करून त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे आयोजिन करण्यात आले. काही ठिकाणी वाचन कौशल्यावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांची ग्रंथालयाला भेट, विद्यार्थी लेखक परिसंवाद तसेच ग्रंथालयाच्या सभागृहात ग्रंथप्रदर्शन ठेवून त्यातील एका पुस्तकाचे किमान एक तास वाचन करणे असा सामूहिक उपक्रम सुद्धा राबविण्यात आला. त्याच्या मागील मूळ उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी. जो तरुण सध्या वाचनापासून दुरावत चालला आहे तो दुरावा दूर करणे होय. त्यासाठी आता विद्यार्थ्यांनी स्वत:हून रोज वाचन केले पाहिजे. यातच त्यांचे खरे हित आहे. वाचाल तरच आपण वाचू शकता ही आजची राज्यातील परिस्थिती आहे. त्यामुळे वाचनाकडे विद्यार्थी तसेच नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.
वाचनाचा विचार करता वाचनामुळे आपले ज्ञान वाढते तसेच आपल्या ज्ञानात अधिक भर पडत असते. सन २०२५ च्या वाचन संकल्पाचा विचार करता हा संकल्प म्हणजे राज्यामध्ये वाचन संस्कृती वाढविणारा आहे. वाचन संकल्प महाराष्ट्र या उपक्रमाचा मूळ उद्देश्य विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना वाचनाची सवय निर्माण व्हावी होय. यामुळे त्यांचा वैयक्तिक विकास होण्याला मदत होईल. तसेच त्यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळू शकते. त्याचप्रमाणे वाचनाने ते प्रेरित होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्याला मदत होईल. यासाठी प्रत्येकांनी वाचलेच पाहिजे. तरच आपण वाचू शकतो. वाचनामुळे आपल्यात जाणीव-जागृती निर्माण होते. या उपक्रमामध्ये तरुण मुलांना पुस्तक वाचनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी पुस्तकाचे सामूहिक वाचन, मुलांचे पुस्तक वाचन, वाचन कौशल्य सुधारण्यासाठी कार्यशाळा, मुलांनी एकमेकांना वाचन संवाद करणे, एखादे पुस्तक परीक्षण आणि पुस्तक वाचून त्याचे सारांश रूपाने कथन करणे असे विविध प्रकारे उपक्रम राबवण्यात आले. हेच उपक्रम मुलांना वाचनाची आवड निर्माण करीत असतात. तसेच वाचनाच्या संदर्भात विविध स्पर्धा आयोजित करण्यात येऊन २६ जानेवारी रोजी विजेत्या स्पर्धकाचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना वाचनाची अधिक गोडी निर्माण होण्याला मदत होणार आहे.
अलीकडच्या काळात मोबाईलच्या दुनियेत वावरणाऱ्या विशेषत: तरुणाईचा विचार करता त्यांनी पुस्तकांकडे अक्षरशः पाठ फिरवलेली दिसते. त्यामुळे हा उपक्रम नक्कीच विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असून या उपक्रमामुळे पुस्तके वाचण्याकडे मुलांचा कल निर्माण होईल. तसेच वाचनाची आवड निर्माण झाल्याने ग्रंथालयात विद्यार्थी जावू लागतील. केवळ मोबाईलमुळे मुले पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम अलीकडच्या काळात जाड काचेतून डोळे फाडून बघण्याची वेळ काही मुलांवर आलेली दिसत आहे. हे राज्यातील तरुणाईसाठी घातक आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल. आता राज्यातील प्रत्येक मुलांच्या आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना पुस्तक वाचनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मुलांनी सुद्धा किमान अवांतर पुस्तकी वाचनाकडे दर दिवशी आपला अभ्यास करून अवांतर वाचन केले पाहिजे. यामुळे त्यांच्या अवांतर ज्ञानात वाढ होत असते. विशेष म्हणजे वाचन केल्यामुळे मनावरील ताणतणाव कमी होण्याला मदत होते. तसेच नियमित वाचनामुळे मुले वाचनाकडे आकर्षित होऊन वाईट मार्गाला
जात नाहीत.
आता जरी २०२५ या नवीन वर्षाचा पंधरवडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा साजरा केला तरी विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी काही तास मोबाईलरावांना बाजूला ठेवून किमान अर्धा तास पुस्तकाचे वाचन करावे. वाचनामुळेच आपण वाचू शकतो हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा राज्यातील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, आणि नागरिक यांना वाचनाची अधिक गोडी वाटणार आहे असे जरी वाटत असले तरी शालेय अभ्यासक्रमात वाचनासाठी विद्यार्थ्यांना दर दिवशी वेळ द्यावा. म्हणजे राज्यातील वाचनालये बंद पडणार नाहीत. तेव्हा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा राबवण्यात जरी आला तरी मी दररोज किमान अर्धा तास अवांतर वाचन करेन असा संकल्प विद्यार्थ्यांनी करायला हवा.