पुणे : दरवर्षी १५ जानेवारी रोजी भूदल लष्कर दिन (Army Day / आर्मी डे) साजरा करते. आधी दरवर्षी दिल्लीत लष्कर दिनाचे संचलन व्हायचे. पण मागील काही वर्षांपासून देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये लष्कर दिनाचे संचलन होते. यंदा भारतीय लष्कर पुण्यात लष्कर दिनानिमित्त विशेष संचलन करणार आहे. पुण्यात बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या (Bombay Engineer Group) मैदानावर बुधवार १५ जानेवारी रोजी लष्कर दिनानिमित्त (Army Day) संचलन होणार आहे. या संचलनात नेपाळी लष्कराचा ३३ सदस्यांचा वाद्यवृंद (Band Troop) सहभागी होणार आहे. संचलनात एक महिला अग्निवारांचे पथक आणि एक महिला राष्ट्रीय छात्र सेनेच्या (National Cadet Corps) सदस्यांचे पथक पण सहभागी होणार आहे.
पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा, नौदलाच्या तीन नौकांचे राष्ट्रार्पण
लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी लष्करप्रमुख पदाची सूत्रं हाती घेतली. ते देशाचे पहिली भारतीय लष्करप्रमुख होते. याआधी ब्रिटीश जनरल फ्रान्सिस रॉय बुचर रॉयल इंडियन आर्मीचे नेतृत्व करत होते. देश स्वतंत्र झाला तरी सुरुवातीचा काही काळ लष्कराचे नेतृत्व नेहरू सरकारने त्यांच्याकडेच ठेवले होते. पण करिअप्पा यांनी सूत्रं हाती घेतली आणि स्वतंत्र भारताला पहिला भारतीय लष्करप्रमुख मिळाला. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कराच्यावतीने लष्कर दिन (Army Day / आर्मी डे) साजरा केला जातो. भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान आणि सैनिकांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लष्कर दिन साजरा करतात. यानिमित्ताने संचलन (परेड), शस्त्रास्त्र प्रदर्शन, चर्चासत्र, व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दिल्लीतील करिअप्पा मैदानावर दरवर्षी १५ जानेवारी रोजी लष्कर दिनानिमित्त विशेष संचलन व्हायचे. पण लष्कराविषयी तरुणांमध्ये आकर्षण वाढावे आणि अधिकाधिक तरुणांनी सैन्य भरतीत सहभागी व्हावे यासाठी मागील काही वर्षांपासून देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये लष्कर दिनाचे संचलन होते. बंगळुरूत २०२३ मध्ये तर लखनऊत २०२४ मध्ये लष्कर दिनाचे संचलन झाले. यंदा पुण्यात लष्कर दिनाचे संचलन होत आहे.
पुण्याला भारतीय लष्करात महत्त्वाचे स्थान आहे. पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए आणि भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय अर्थात सदर्न कमांड हेडक्वार्टर आहे. मराठा साम्राज्य अटकेपार घेऊन जाणाऱ्या पेशव्यांचा शनिवार वाडा पण पुण्यात आहे. यामुळे यंदा पुण्यात लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुण्यातील लष्कर दिनाच्या संचलनाला उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या संचलनाची संकल्पना ‘समर्थ भारत, सक्षम सेना’ ही आहे. पुण्यातील लष्कर दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आधुनिक शस्त्रे बघण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. यामध्ये अर्जुन एमके-१ए टँक, के-९ वज्र हॉवित्झर तोफा, आधुनिक ड्रोन यांचा समावेश आहे. मैदानावर पॅरा जम्पिंगचे लाईव्ह डेमो, कॉम्बॅट ड्रिल्स आणि लष्करी बँडचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. यंदाच्या संचलनात प्राण्यांसारखे दिसणारे भारतीय बनावटीचे रोबो (रोबोटिक म्युल्स) पण सहभागी होतील.