भाजपाने शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना एकत्र घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याचे ठरवले आहे, हे अमित शहा यांच्या शिर्डी येथील विशाल मेळाव्यातून स्पष्ट झाले. भारतीय जनता पार्टीचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीत झाले. या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं तर विरोधकांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा मोठा कार्यक्रम झाला. यावेळी दगाफटक्याच्या राजकारणाला गाडलं आणि खऱ्या शिवसेनेचा आणि खऱ्या राष्ट्रवादीचा विजय झाला असे म्हटले. शहा यांनी कालच्या शिर्डी येथील भाषणात मुंबई महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाच शिवसेना उबाठा यांचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका केली. कारण याच दोन पक्षांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची घातक चाल खेळली होती. त्याचे पडसाद अमित शहा यांच्या भाषणात उमटले. अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. विरोधी पक्षांवर टीका करायचीच असते, पण पवार आणि ठाकरे यांच्यावर टीका करून शहा यांनी दाखवून दिले की या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्र कसा मागे गेला आहे.
पवार यांनी देशात इतकी वर्षे मंत्रीपदे भोगली पण ते शेतकरी आत्महत्या रोखू शकले नाहीत. तेच ठाकरे यांच्याबाबतीत झाले. ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिंदे आणि अजित पवार यांनी अभूतपूर्व यश मिळवले. पवार आणि ठाकरे यांच्या पक्षांना नाकारणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे शहा यांनी आभार मानले. कारण या यशाने भाजपाला महाराष्ट्रात उत्तर प्रदेशनंतर मोठे राज्य हाती आले आहे. आता भाजपाचे मुंबई महापालिका निवडणुकांकडे लक्ष्य आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याचे आवाहन यावेळी शहा यांनी केले आहे. भाजपाची घोषणा आहे पंचायत तेे पार्लमेंटपर्यंत आणि ती यंदाच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांपासून खरी ठरेल यात काही शंका नाही. भाजपाच्या इतिहासातील हे सर्वात भव्यदिव्य अधिवेशन आहे हे शहा यांनी उद्गार काढले ते खरेच होते. कारण विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशाने भाजपामध्ये अत्यंत आत्मविश्वास सळसळतो आहे आणि त्याचे प्रतिबिंब या भाजपाच्या कार्यक्रमात उमटले.
स्वागत फलक, भगवे झेंडे, भाजपाच्या घोषणांनी साईनगरी दुमदुमली होती आणि त्यामुळे एकूणच वातावरणात भगवे चैतन्यपूर्ण वातावरणा उफाळले होते. शहा यांच्या भाषणात या साऱ्या गोष्टींचे प्रतिबिंब उमटले होते आणि भविष्यात भाजपाची पुढील वाटचाल काय असेल याचा अंदाजही आला. अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. कारण महाविकास आघाडी ही घरघर लागलेली आघाडी आहे. या आघाडीतील तीनही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले आहेत आणि त्यात आपला पराभव झाला आहे हे त्यांच्या गावीही नाही. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात प्रचंड फरक आहे. काँग्रेसच्या मेळाव्यात पूर्वी काँग्रेस नेत्यांचा आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा उदोउदो होई. कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागे आणि त्यामुळे सारे नेते आणि पदाधिकारी वरिष्ठांची चापलुसी करण्यात मग्न होत. आता असे चित्र दिसले नाही. उलट सारे नेते आणि आमदार तसेच खासदार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना गौरवले कारण त्यांच्यामुळेच भाजपाला हे यश मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणजे त्यातही मुंबई, ठाणे, संभाजीनगर वगैरे महापालिका निवडणुका याच महत्त्वाच्या आहेत आणि त्यात आता भाजपा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता भाजपाचा संघर्ष स्थानिक पातळीवर रंगणार आहे. शहा यांनी तर विरोधकांना म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा यांना एकही जागा मिळू देऊ नका असा संदेशच दिला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. अर्थात विधानसभा निवडणुकांपासून भाजपासाठी वातावरण अनुकूल आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशीष शेलार, नारायण राणे, नितेश राणे अशी ताकदवान टीम भाजापाकडे आहे. बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आिण उद्धव यांच्या नेतृत्वाखालील संघटना यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. उद्धव यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहासाठी काँग्रेसशी सलगी करून भाजपाकडे जाण्याचे दोर स्वत:च कापून टाकले. उद्धव यांनी बाळासाहेबांची विचारधारा सोडून दिल्यामुळेच आज त्यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिक नसलेल्या संघटनेचे पक्षप्रमुख म्हणून वावरावे लागत आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. अमित शहा यांनी शरद पवार यांच्या दगाफटक्यांच्या राजकारणावर जोरदार शरसंधान करताना त्यांच्या राजकारणापासून सुरू झालेल्या नेत्यांची फोडाफोडी आणि ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह केल्यानंतर आणि नंतर त्यांनी भाजपाच्या पाठीत खुपसलेला खंजीर यामुळे भाजपा आणि एकूणच सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली चीड यामुळे हे दोन्ही पक्ष आज रसातळाला पोहोचले आहेत हे शहा यांचे म्हणणे मान्य करण्यासारखेच होते.
भाजपाला आता मुंबई महापालिका आणि ठाणे तसेच छत्रपती संभाजीनगर या पालिका जिंकण्याचे आव्हान पार करावे लागणार आहे. शहा यांच्या भाषणातून तो विश्वास कार्यकर्त्यांना मिळाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शहा यांचे भाषण कार्यकर्त्यांच्या मनात नवा जोम आणि त्यांना नवीन आवेश देऊन गेले यात काही शंका नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांतही भाजपा विधानसभेसारखेच भरघोस यश मिळवेल अशी आशा शहा यांच्या भाषणाने निर्माण झाली आहे. साईनगरीत झालेल्या या सभेने भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण करून गेले. त्यामुळे भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यात लाडकी बहीण योजना मदतीला आहेच. त्यामुळे भाजपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतही बाजी मारेल, असे चित्र कालच्या शहा यांच्या सभेनंतर निर्माण झाले.