Saturday, September 13, 2025

भारतातील दोन शहरात होते सर्वाधिक वाहतूक कोंडी

भारतातील दोन शहरात होते सर्वाधिक वाहतूक कोंडी
नवी दिल्ली : ताज्या पाहणीनुसार भारतातील दोन शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. यात आघाडीवर आहे ती पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटकची राजधानी बंगळुरू. कोलकाता आणि बंगळुरू या दोन शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते.
कोलकातामध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३४ मिनिटे ३३ सेकंद लागतात तर बंगळुरूमध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३४ मिनिटे १० सेकंद लागतात. डच लोकेशन टेक्नॉलॉजी टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३३ मिनिटे मिनिटे २२ सेकंद लागतात. यामुळे ट्रॅफिक इंडेक्समध्ये पुणे शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारीत वाहतूक कोंडीच्या बाबतीत कोलकाता दुसऱ्या, बंगळुरू तिसऱ्या आणि पुणे चौथ्या क्रमांकावर आहे.
टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार हैदराबादमध्ये वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३२ मिनिटे लागतात. तर चेन्नईत वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईत वाहनातून दहा किमी. अंतर पार करण्यासाठी किमान २९ मिनिटे लागतात. जुने रस्ते, रस्त्यांचा घसरलेला दर्जा, शहराच्या नियोजनातील ढिसाळपणा, वाहनांची वेगाने वाढणारी संख्या अशा वेगवेगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून देशातील प्रमुख शहरांतील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रस्त्यांचा दर्जा सुधारणे, शहराचे योग्य प्रकारे नियोजन करणे, सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा वापर करण्यासाठी चालना देणे असे वेगवेगळे उपाय करुन मंदावलेल्या वाहतुकीचा वेग वाढवणे शक्य आहे; असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment