बीड : बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समिती नेमण्यात आल्या. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच या घटनेमुळे राज्याचे वातावरण ही चांगलेच तापले असून अनेक सत्ताधारी नेत्यांनी देखील या संदर्भात आवाज उठवला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. यामुळे वाल्मिक कराडचा शस्त्रपरवानाही रद्द करण्यात आला आहे.
१०० जणांना शस्त्र परवाना रद्द
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १०० जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे.
शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हा सध्या सीआयडी कोठडीत असल्याने त्याच्यापर्यंत अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. (Santosh Deshmukh)