भालचंद्र कुबल
कधी कधी नकळत अजाणतेपणे एखाद्या नाटकावर लिहावेसे वाटत असूनही लिहिणे राहून जाते. “आय अॅम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ” हे असेच एक राहून गेलेले नाटक. मुंबईत अचानकपणे हे नाटक बघण्याचा योग आला होता, परंतु नाटकाबाबत लिहिण्यासारखे बरेच मुद्दे असूनही लिहायले जमले नव्हते. नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या महापारेषण राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत वाशी केंद्राच्या हौशी रंगकर्मी कर्मचाऱ्यांनी केलेला प्रयोग पाहिला आणि त्याचा परिणाम म्हणजे हे नाट्यनिरीक्षण होय. प्रशांत निगडे हे नाव तरुण रंगकर्मींपैकी वैविध्य प्रयोगांसाठी नवीन नाही. फासेपारधी या जमातीबद्दल नाट्यरूपाने लिखाण करणे म्हणजे एक प्रकारे संशोधित कार्यच आहे, जे या अगोदर दृृृृष्य स्वरूपात कुणीही मांडलेले नाही. या फासेपारधी जमातीबद्दल बोलता बोलता पुंगळ्या नामक अस्तित्वातच नसलेल्या एका भारतीय नागरिकाचे अस्वस्थ करणारे विवेचन म्हणजे हे नाटक आहे. कधी मोकळ्या माळरानावर तर कधी डोंगरदऱ्यात पालं टाकून आयुष्य ढकलणारे मतलबी-पुंगळ्या हे जोडपे म्हणजे भटक्या विमुक्त जमातीचे प्रातिनिधित्व करणारे २१ व्या शतकातील पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र देशाचे जळजळीत वास्तव आहे. रोजच्या शिकारीवर, दोन-तीन दिवसांच्या शिळा भाकर तुकडा पाण्यात भिजवून खायला न लाजणारे हे कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी प्रसंगी जीवावर उदार होऊन जगण्यासाठी ज्या संघर्षाशी सामना करतात, तो शहरातल्या पांढरपेशा समाजाच्या आकलनाच्या बाहेरचा आहे.
पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ नामक फासेपारधी इसमाला अस्तित्वच नाही. आजमितीला त्याच्या नावाचे ना आधारकार्ड आहे, ना कुणा एन.जी.ओ.ने दिलेले शिफारसपत्र. शहरात कुठलाही गुन्हा घडला की प्रथम फासेपारध्यांना अटक करून खोटे गुन्हे त्यांच्या नावावर चढवण्याचा पोलिसांचा जणू शिरस्ताच आहे. गरिबाला न्याय कधी मिळत नसतो या समजुतीवर त्याच्या तोंडचे एक वाक्य आंतरबाह्य हलवून टाकते. लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून पूर्ण नाटकाचे सार कळते, “या देशात गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच झाली नाही तो?”… आणि मग सुरू होतो तो पुंगळ्याचा अस्तित्वाचा दाखला मिळवण्यासाठीचा संघर्ष. एके दिवशी त्याने लावलेल्या फाशात कधीही न पाहिलेला पक्षी सापडतो. बऱ्याच ठिकाणी विचारणा केल्यानंतर तो दुर्मीळ पक्षी पुंगळ्याचे नशीब बदलणार याचे संकेत दिसू लागतात. एक पक्षी निरीक्षक पुंगळ्याला मिळालेल्या पक्ष्याच्या शोधात फासे पारध्यांच्या वस्तीवर दाखल होतो आणि त्यातूनच पुढे त्या पक्षाला आणि पुंगळ्याला ओळख मिळते. लेखकाने या दोघांचा मांडलेला रूपकात्मक लेखाजोखा म्हणजे या नाटकाचे कथासूत्र आहे.
फासे पारध्याचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांची बंडखोरी, त्यांची माणुसकी बघताना एका वेगळ्या समाज जीवनाच्या परिघात आपण प्रवेश करतो. हे नाटक जगण्याची लढाई आहे. फासेपारधी समाजाला इंग्रजांनी चोर आणि दरोडेखोर म्हणून दिलेला शिक्का आजही कायम आहे. या वस्तीत ‘माणूस’ राहतो हे मान्य करायला इतर समाज अजून तयार नाहीत. प्रशांत निगडे आणि त्यांच्या टीमने एका वेगळ्या संस्थेद्वारा या नाटकाच्या प्रयोगाने जी वेगळी उंची गाठली त्याची नोंद नाटकांच्या इतिहासात घेतली जावी हाच या निरीक्षणामागचा मुख्य हेतू आहे. नाट्यरसिकांना या नाटकाची कुठलीही आवृत्ती पाहायला मिळाली तर आवर्जून पाहावी.