Friday, September 19, 2025

धनंजय मुंडेंनी कोट्यवधींची जमीन २१ लाखांत हडपली, सारंगी महाजनांचा आरोप

धनंजय मुंडेंनी कोट्यवधींची जमीन २१ लाखांत हडपली, सारंगी महाजनांचा आरोप
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्येचे प्रकरणाला आता इतर विषय जोडले जाण्यास आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धमकावले आणि गावातली साडेतीन कोटी रुपयांची जमीन अवघ्या २१ लाख रुपयांत खरेदी केली. धमकावून जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी बदलल्या, असा गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. सारंगी महाजन या धनंजय मुंडेंच्या मामी आहेत.
प्रवीण महाजनांच्या निधनाला जवळपास पंधरा वर्षे झाली. आता आमच्या गावातल्या संपत्तीवर यांचा डोळा आहे. धनंजय मुंडेंचे नोकर गोविंद मुंडे यांनी धमकावले. धमकावून जबरदस्तीने सह्या घेतल्या आणि जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नोंदी बदलल्या. आता जमीन गोविंद मुंडे, त्यांची सून आणि दशरथ साठे यांच्या नावावर आहे. आधी या विषयाची माहितीच नाही असे दाखवणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मामी, काळजी करु नकोस. परळीत कोणतीही जमीन विकली गेली तर ती मला कळते असं सांगून धीर दिला होता. पण मी चोराकडेच गेले होते, ते नंतर माझ्या लक्षात आलं, असं सारंगी महाजन म्हणाल्या.
याआधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे. हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा विश्वासू आणि अतिशय जवळच्या माणसांपैकी एक असल्याच्या बातमी वृत्तवाहिन्यांनी दिल्या आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही मागणी जोर धरत असतानाच सारंगी महाजन यांनी जमीन हडपण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. यामुळे धनंजय मुंडे यांची आणखी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोण आहेत सारंगी महाजन ? सारंगी महाजन या प्रवीण महाजनांच्या पत्नी आणि भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वहिनी आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा