Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार, २८ दिवसांचा फर्लो मंजूर

अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार, २८ दिवसांचा फर्लो मंजूर
नागपूर : डॅडी या नावाने ओळखला जाणारा मुंबईतला डॉन अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात आहे. नियमानुसार अरुण गवळीला २८ दिवसांचा फर्लो मंजूर झाल्यामुळे तो संचित रजेवर तुरुंगाबाहेर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला २८ दिवसांची फर्लो मंजूर केली आहे. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला आहे.



अरुण गवळीने १८ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूरच्या कारागृह महानिरीक्षक यांच्याकडे संचित रजेसाठी अर्ज केला होता. पण अरुण गवळीचा गुन्हेगारी विश्वातील प्रभाव आणि लवकरच होणार असलेल्या निवडणुका यामुळे पोलिसांनी कायदा - सुव्यवस्थेचे कारण पुढे फर्लोला मंजुरी दिली नव्हती. अखेर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. सुनावणीअंती न्यायालयाने अरुण गवळीला फर्लो मंजूर केली.



रजेवर असताना अरुण गवळीने प्रत्येक वेळी कायद्याचे पालन केले. फर्लो मंजूर करतेवेळी घातलेल्या अटी - शर्तींचेही पालन केले. यामुळे यावेळीही फर्लो देण्याची विनंती अरुण गवळीने न्यायालयाकडे केली. अखेर न्यायालयाने अरुण गवळीची फर्लोची रजा मंजूर केली.



अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. हत्येची घटना २००७ मध्ये घडली. या प्रकरणात अरुण गवळी आणि इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे.

पॅरोल आणि फर्लो म्हणजे काय ?

पॅरोल (अभिवचन रजा) देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार तर फर्लो (संचित रजा) मंजूर करण्याचा निर्णय तुरुंग प्रशासन घेते. पॅरोलचा किमान कालावधी एक महिना आणि कमाल कालावधी तीन महिने असतो. फर्लोचा किमान कालावधी १४ दिवस आणि कमाल कालावधी २८ दिवसांचा असतो. अपवादा‍त्मक परिस्थितीत फर्लोत वाढ केली जाते. कैद्याला जेवढे दिवस पॅरोल स्वरुपात रजा मिळते तेवढे त्याचे शिक्षेचे दिवस वाढत जातात. या उलट फर्लोचे दिवस हे शिक्षेत मोजले जातात. यामुळे फर्लो घेतलेल्या कैद्याच्या शिक्षेच्या कालावधीत वाढ होत नाही. रजेच्या काळात कायद्यांचे पालन करणे, गुन्हा न करणे अशा वेगवेगळ्या अटींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असते. अटींचे उल्लंघन झालयास पुन्हा पॅरोल किंवा फर्लो मिळत नाही.

कोण आहे अरुण गवळी ?

अरुण गुलाब गवळी याने १९७० च्या दशकात मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. रमा नाईक १९८८ मध्ये पोलीस चकमकीत ठार झाला. यानंतर गवळीने टोळीचे नेतृत्व हाती घेतले. अरुण गवळी भायखळा येथील दगडी चाळ या निवासस्थानातून टोळीचे नियंत्रण करत होता. गवळी टोळीच्या कारवाया प्रामुख्याने मध्य मुंबईत सुरू होत्या. पुढे गवळी टोळीचा दाऊदच्या गुंडांशी संघर्ष सुरू झाला. महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना - भाजपा युती सरकार सत्तेत आले. यानंतर अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. अरुण गवळी २००४ मध्ये अभासेच्या तिकिटावर चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाला. पण त्याचा भाचा सचिन अहिर याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे अरुण गवळीचे राजकीय गणित बिघडले. लोकसभा निवडणुकीत अरुण गवळी, सचिन अहिर आणि शिवसेनेचे मोहन रावले या तिरंगी लढत झाली. यात अरुण गवळी आणि सचिन अहिर यांचा पराभव झाला. मोहन रावले खासदार झाले. पुढे जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्याचे राजकारण कायमचे संपले.
Comments
Add Comment