पालघर : राजस्थानमध्ये अजमेर येथील बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवून घरी परतत असताना तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आणि चार तरुण गंभीर जखमी झाले. सर्व तरुण पालघर जिल्ह्यातील रहिवासी होते. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.
दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर तरुण कारने घरी परतत होते. त्यांच्या कारचा गुजरातमध्ये भरुच येथील अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला. वेगाने येणारी आर्टिगा कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात आयान बाबा चोगले (रा. मनोर), ताहीर नासिर शेख (रा. पालघर) आणि मुदस्सर अन्सार पटेल (रा. टाकवहाल) या तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला. सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व (रा. काटाळे) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर भरुचमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Buldhana Hair Loss : बापरे! विचित्रच घडतंय, ३ दिवसांतच पडतंय टक्कल!
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. क्रेन आणि गॅस कटर या साधनांचा वापर करून जखमींना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात अतिशय भीषण होता. यात कारचा चेंदामेंदा झाला. जे वाचले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे, जीवाला धोका आहे; असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातामुळे मध्यरात्री थोडा वेळ अंकलेश्वरमध्ये बाकरोल पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती. पण वाहतूक पोलिसांनी लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात प्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.