मुंबई : मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर गुंतवणूकदारांना आठवड्याला सहा टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून महामुंबईमध्ये (Mumbai News) विविध ठिकाणी हिऱ्यांच्या दागिन्यांचे दालन थाटणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपली सर्व दुकाने बंद करून पोबारा केला. त्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या हजारो नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान मंगळवारी या कंपनीच्या दादरमधील टोरेस (Torres) बँड कार्यालयातील महाव्यवस्थापकासह तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
HMPV Virus : मुंबईतही पोहोचला एचएमपीव्ही; सहा महिन्यांच्या चिमुकलीला लागण
या प्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवलेंको, तौफिक रियाज कार्टर, तानिया कसतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील कंपनीचा संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार यांचा समावेश आहे. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी दुपारी स्थानिक न्यायालयाने सोमवार, १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यांत अजून सात ते आठजणांना आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.