१९७४ आणि १९९८च्या अणुचाचण्यांमध्ये प्रमुख भूमिका बजावलेले प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला असे अणु ऊर्जा विभागाने त्यांच्या जाण्याबद्दल माहिती देताना सांगितलेे. आर चिदंबरम हे ओळखले जातात ते त्यांची विज्ञानाप्रती असलेली दुर्दम्य निष्ठा आणि विज्ञान क्षेत्राला त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे दूरदर्शी नेतृत्व कायम स्मरणात राहील असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. जागतिक दर्जाचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. चिदंबरम यांच्या भौतिकशास्त्र, क्रिस्टलोग्राफी आणि मटेरिअल सायन्स या क्षेत्रातील संशोधनामुळे देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला हातभार लागला. या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे देशात आधुनिक साहित्य विज्ञान संशोधनाचा पाया रचण्यास मदत झाली. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून तसेच अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचे काम उल्लेखनीय होते. त्यांचा काळ होता तो १९७४ चा म्हणजे त्या काळात भारताला विज्ञान क्षेत्रात खिजगणतीतही धरले जात नव्हते. भारत-बांगलादेश युद्ध नुकतेच संपले होते आणि भारताला अशा अणुबॉम्बची गरज होती की, ज्यामुळे जगाला विशेषतः अमेरिकेला धाक वाटेल. ती गरज चिदंबरम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
१९७४ मध्ये देशाच्या पहिल्या पोखरण अणुचाचण्यांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि आज आपण चंद्रावर जाऊन आलो आहोत आणि आता, तर सूर्यावर जाण्याची स्वप्ने पाहत आहोत. त्याचा पाया चिदंबरम यांच्यासारख्या अणुशास्त्रज्ञांनी रचला आहे. याचे विस्मरण करून चालणार नाही. केवळ अणुशास्त्रच नव्हे, तर सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यातही त्यांची भूमिका मोलाची राहिली. सुपर कॉम्प्युटरचा स्वदेशी विकास करण्यात आणि राष्ट्रीय ज्ञान नेटवर्कची कल्पना विकसित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. डॉ. चिदंबरम हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे नायक होते आणि त्यांनी विज्ञान क्षेत्रात पुढाकार घेतल्यानेच कित्येक पिढ्या विज्ञान क्षेत्रात आल्या आणि पुढेही वाटचाल करत राहिल्या. त्यांचे वर्णन जे ट्रेल ब्लेझर या शब्दात केले जाते ते यथार्थ आहे. त्यांच्यानंतर अनेक शास्त्रज्ञ भारतात झाले आणि ते आजही त्यांच्या मार्गानेच वाटचाल करत आहेत. पण चिदंबरम यांची संपूर्ण कारकीर्द ही भारताची अण्वस्त्रे विकसित करण्यात गेली आणि त्यांच्यामुळेच भारत आज पाकिस्तानच्या वरचढ ठरत आहे. त्यांचे हे कार्य कधीही विसरले जाणार नाही. त्या काळात जेव्हा विज्ञानाकडे उपहासाने पाहिले जाई तेव्हा चिदंबरम यांनी हे क्षेत्र निवडले आणि या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च स्थान पटकावले.
आज मूलभूत विज्ञान क्षेत्राला वाईट दिवस आले आहेत. भौतिक विज्ञान या विषयाकडे वळण्यास मुले-मुली उत्सुक नसतात. कारण या क्षेत्रात लवकर पैसा मिळत नाही. त्या उलट संगणक आणि अभियांत्रिकी या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. त्या काळात चिदंबरम यांचे जाणे हे निश्चितच क्लेशकारक आहे. १९६२ मध्ये त्यांचा प्रबंध डॉक्टरेटसाठी स्वीकारला गेला आणि १९७४ मध्ये त्यांनी अणुचाचण्यांच्या कार्यक्रमाचा पदभार स्वीकारला. या अत्यंत यशस्वी कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून स्वतः इंदिरा गांधी यांनी त्यांना सन्मानित केले होते आणि त्यानंतर त्यांना पद्मभूषण अशा गौरवाने सन्मानित करण्यात आले. भाभा अणु संशोधन केंद्राचे ते संचालकही होते. अर्थात चिदंबरम यांना भारताच्या अणुचाचणी कार्यक्रमात सहभागी होण्याची शिक्षाही मिळाली. त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला. कारण तेव्हा अमेरिकेचा भारताच्या अणुचाचण्यांवर राग होता. तो राग नंतर पंतप्रधान वाजपेयी यांनाही सोसावा लागला. डॉ. आर. चिदंबरम हे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी प्रिंसिपल सायंटिफिक अॅडव्हायझर म्हणूनही काम केले आहे. भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांना दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. चिदंबरम यांना १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषणसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारने त्यांना दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करून भारत सरकारने जणू त्यांच्या अणुचाचण्यांतील सहभागाची कबुलीच दिली. याशिवाय त्यांना कित्येक पुरस्कार मिळाले त्यांची तर गणतीच नाही. अत्यंत बुद्धीमान असा हा भौतिक शास्त्राचा विद्यार्थी पुढे भारतात प्रचंड गाजला. चिदंबरम हे त्या काळात अणुशास्त्रज्ञ होते ज्या काळात विद्यार्थी कला शाखा सोडून अन्यत्र जाण्याचा विचारही करत नसत. फक्त दहावीला साठ टक्के मिळवणारेच विद्यार्थी भौतिक शास्त्र अशा शाखांमध्ये जात आणि नंतर त्या विषयात करिअर करत. अणुचाचण्या भारताने दोन वेळा केल्या आणि दोन्ही वेळा पाश्चात्य देशांचा राग ओढवून घेतला. पण त्यावेळच्या सरकारांची ती मजबुरी होती आणि अणुचाचण्या करणे अपरिहार्य होते. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांच्यासारख्या हुशार आणि कुशल शास्त्रज्ञामुळे भारताने हे आव्हान परतवून लावले. भारताने प्रथम जेव्हा अणुकार्यक्रम जाहीर केला तेव्हा इंदिरा गांधी यांना अमेरिकेचा रोषाचा सामना करावा लागला. पंतप्रधान वाजपेयी यांनी जेव्हा अणुकार्यक्रम जाहीर केला आणि तो अमलातही आणला तेव्हा त्यांना अमेरिकेला आम्ही प्रथम अणुचाचण्या करणार नाही असे आश्वासन द्यावे लागले. या दोन्ही अणुचाचण्यांमध्ये चिदंबरम यांची भूमिका महत्त्वाची होती हे विशेष. ज्यांच्या योगदानामुळे भारताची आण्विक क्षमता आणि धोरणात्मक आत्मनिर्भरता वाढली. चिदंबरम यांच्या निधनाने भारताची अपरिमित हानी झाली आहे हे म्हणणे रास्तच आहे.