रमेश तांबे
एक होता राजा. त्याचे राज्य खूप मोठे होते. राजा पराक्रमी आणि दयाळू होता. त्याचे त्याच्या प्रजेवर प्रेम होते. एके दिवशी राजा आपल्या राज्यात फिरत होता. सगळी लोकं कामं करत होती. आनंदाने राहत होती. ते पाहून राजा समाधानी झाला.
फिरता फिरता तो दूरवर शहराच्या बाहेर आला. तिथे त्याला रस्त्याच्या कडेला एक झोपडी दिसली. झोपडीच्या अंगणात एक लोहार काम करीत होता. त्याने शेगडी पेटवलेली होती. एका हाताने तो भाता ओढत होता, तर दुसऱ्या हाताने त्या शेगडीत लोखंड गरम करत होता. गरम वस्तूवर घणाचे घाव घालत होता. तो घामाघूम झाला होता. त्याला पाहून राजाला दया आली. राजा घोड्यावरून खाली उतरला आणि लोहाराकडे गेला.
चक्क राजा आपल्याजवळ आल्याचे पाहून लोहाराने अदबीने राजाला नमस्कार केला. राजा म्हणाला, “अरे लोहारा, मी तुझे काम पाहिले, तुझे कष्ट पाहिले, तुझी झोपडी पाहिली. माझ्या राज्यातले लोक असे गरीब राहता कामा नये असे मला वाटते. म्हणून मी तुला माझी चंदनाची शाही बाग भेट देत आहे.” लोहाराने मोठ्या नम्रपणे ती चंदनाची बाग भेट म्हणून स्वीकारली आणि राजा समाधानाने महालात परतला. राजाला वाटले चला एका गरीब लोहाराचे आयुष्य आपण बदलून टाकले. यापुढे त्याला त्याच्या जीवनात कोणतीही चिंता उरणार नाही! या गोष्टीला वर्ष पूर्ण झाले. एके दिवशी राजाला वाटले, चला आपण चंदनाची बाग दिलेल्या लोहाराची भेट घेऊया. त्याचे बदललेले, श्रीमंत, समृद्ध आयुष्य बघूया! मग राजा घोड्यावर बसून राज्याची पाहणी करत करत त्या ठिकाणी पोहोचला. पाहतो तर काय लोहाराची झोपडी जशीच्या तशी. उलट अजून मोडकी तोडकी झाली होती. लोहार तसाच घणाचे घाव तापलेल्या लोखंडावर घालत होता. अंगावरचा घाम पुसत होता. राजाला आश्चर्य वाटले, “अरे, हा लोहार अजूनही तसाच गरीब अवस्थेत का राहतोय! मी दिलेल्या चंदनाच्या बागेचे त्याने काय केले?
जवळ जाऊन राजाने लोहाराला विचारले, “काय रे, मी दिलेल्या चंदनाच्या बागेचे तू काय केलेस? तू अजूनही असा झोपडीतच गरिबीचे दिवस का काढतो आहेस?” लोहार म्हणाला, “महाराज मी साधा अडाणी माणूस. लोहारकाम करण्याशिवाय दुसरे काय करणार!” “अरे पण तू त्या चंदनाच्या बागेचे काय केलेस?” महाराजांनी अधिरतेने विचारले. “सगळ्यात आधी मी त्या बागेतून एक लाकूड आणले आणि माझ्या कुऱ्हाडीसाठी त्याचा दांडा बनवला. मग रोज त्या बागेतली लाकडं माझी भट्टी पेटवण्यासाठी सरपण म्हणून मी वापरली. ती बाग तर केव्हाच संपून गेली आहे!” लोहार निरागसपणे सांगत होता.
राजाने डोक्याला हात लावला. राजा म्हणाला, “अरे वेड्या चंदनाची बाग तू चक्क जाळण्यासाठी सरपण म्हणून वापरलीस. तू एक काम कर, तू तुझ्या कुऱ्हाडीचा दांडा बाजारात विकून ये. मी तोपर्यंत बसतो तुझ्या झोपडी जवळ.” अर्ध्या तासातच लोहार परत आला आणि राजाला आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “महाराज, एवढ्या छोट्याशा दांड्याची मला दहा हजार रुपये किंमत मिळाली. मग त्या एवढ्या मोठ्या चंदनाच्या बागेचे मला किती पैसे मिळाले असते!” तो पश्चातापाने रडू लागला. गयावया करू लागला. “महाराज मी चुकलो. मला चंदनाच्या बागेची किंमत नाही समजली. मला माफ करा आणि परत एक चंदनाची बाग भेट द्या.” महाराज म्हणाले, “नाही लोहारा; भेट एकदाच मिळते. पुन्हा पुन्हा नाही.” असं म्हणून राजा तिथून निघून गेला. माझ्या बालदोस्तांनो, “आपल्याला मिळालेले मानवी जीवन ही एक चंदनाची बागच आहे. त्या अडाणी लोहारासारखी चंदनाची बाग जाळून टाकायची की, तिच्या मदतीने आपले जीवन सुंदर, आनंदी आणि समृद्ध बनवायचे याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे!”