क्राइम – अॅड. रिया करंजकर
लग्न व्यवस्था ही कुटुंबाची संस्कार व्यवस्था होती. पण आता या लग्न व्यवस्थेलाच अनेक तडे गेलेले आहेत. दोन व्यक्तींची मन जुळताना अनेक कठीण प्रसंग येतात. एवढंच नाही, तर या लग्न व्यवस्थेने एकत्र आलेले दोन कुटुंब एकमेकांना पाण्यात पाहतात. एवढं की हे नातेसंबंध कट्टर वैरीमध्ये रूपांतर होत चाललेले आहे.
रूपाली आणि सिद्धार्थ यांनी प्रेमविवाह केला होता. इतर कुटुंबांचा जसा प्रेमविवाहाला विरोध असतो तसाच यांच्याही प्रेमविवाहाला विरोधच झाला होता. सिद्धार्थ हा बँकेत कामाला होता आणि रूपाली ही प्रायव्हेट ठिकाणी कामाला होती. रूपाली ही प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे ती सतत बाहेरगावी फिरत असायची. ही गोष्ट सिद्धार्थला पटत नव्हती. तो तिला ही नोकरी सोडून दे असं अनेकवेळा सांगत असे तरी पण ती ऐकत नसे. ती सरळ सिद्धार्थला म्हणायची, मी नोकरी सोडायला तयार आहे पण माझ्या पगारा एवढा पगार तू मला दे आणि तुझाही पगार मला दे, तर मी घरी बसते. त्यांच्यामध्ये सतत कौटुंबिक वाद होत होते. त्याचबरोबर अनेक वेळा पैशावरूनही वाद होत होते. त्यामुळे रूपाली सतत आपल्या माहेरी राहू लागली होती. त्यामुळे सिद्धार्थलाही संशय आला होता की, ती कुठल्यातरी मुलाबरोबर बाहेर फिरत आहे. एक दिवस रागात सिद्धार्थने आपला खासगी फोटो व्हायरल केला. या गोष्टीवरून रूपालीने सिद्धार्थविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवलेली होती.
सिद्धार्थ तिला अनेकवेळा आपल्या सोबत नांदायला ये असं सांगत होता. त्यावेळी ती माझ्याकडे जास्त पैशाची मागणी करायची आणि त्याच्याबरोबर नांदायला जाण्याचा विषय टाळायची. सिद्धार्थला दाट संशय होता की, तिचा कोणाबरोबर तरी विवाहबाह्य संबंध आहे. त्यामुळे तिला आपल्या सोबत राहायचं किंवा नांदायचं नाहीये आणि म्हणूनच ती जास्त पैशांची मागणी करत आहे. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये रूपाली सिद्धार्थकडे जास्त पैशांची मागणी करत होती आणि हीच गोष्ट त्याला खटकत होती. कारण सिद्धार्थला माहीत होतं की, रूपाली जी रक्कम मागते ते आपण देऊ शकत नाही. म्हणून एक दिवस सिद्धार्थनेच पुढाकार घेऊन रूपालीला आपल्या मित्राच्या घरी भेटायला बोलवलं की जेणेकरून आपण व्यवस्थित बसून बोलू आणि काहीतरी मार्ग काढू. रूपालीही मित्राच्या घरी जायला तयार झाली. रुपालीला वाटलं की, मित्र किंवा त्याचा परिवार घरी असेल त्यामुळे रूपाली सिद्धार्थच्या मित्राच्या घरी गेली. सिद्धार्थ आणि रूपाली तिकडे होते. मित्राला वाटलं की, नवरा बायकोमध्ये भांडण जर मिटत असेल, तर त्यांना आपल्या घरी शांतपणे बोलू दे. ज्यावेळी सिद्धार्थने आपल्याबरोबर राहा, आपण संसार करूया अशा गोष्टी बोलण्यास सुरुवात केली त्यावेळी रूपालीने मला तू मी जेवढे मागते तेवढे पैसे देत जा आणि देत राहा तरच मी तुझ्याबरोबर नांदायला तयार आहे असं ती त्यावेळी बोलली. पुन्हा त्यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला आणि स्वतःचा ताबा सुटलेल्या सिद्धार्थने रूपालीची हत्या करून तिची बॉडी मित्राच्या बाथरूममध्ये लपवून तो तिथून पसार झाला.
मित्राने चांगल्या मनाने आपल्या घरात बसून पती-पत्नी मधला वाद सोडून सुखी संसाराला लागतील या विचाराने चर्चा करण्यासाठी आपल्या घराची चावी दिली होती. पण इथे सिद्धार्थने आपल्या पत्नीचा खून करून मित्राचाही विश्वासघात केला होता. तो आपल्या पत्नीला स्वतःच्या घरी किंवा पत्नीच्या घरी घेऊन जाऊ शकला असता पण तसं न करता त्यांने मित्राचं घर निवडलं आणि स्वतःसोबत त्याने आपल्या मित्रालाही फसवलं होतं.
(सत्यघटनेवर आधारित)