मुंबई: राज्यात पुन्हा एकदा तापमानाचा पारा घसरू लागला आहे. उत्तरेकडचे थंड वारे महाराष्ट्रात येऊ लागल्याने थंडीचा जोर आणखी एकदा वाढू लागला आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्यामध्ये १० अंशापेक्षा अधिक घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलकासा पाऊस तसेच हिमालयालगतच्या भागांमध्ये बर्फवृष्टी होते. त्यामुळे तेथे थंडीचा जोर कमी जास्त होत आहे. शनिवारी मध्य प्रदेशातील मंडला येथे सर्वात कमी ५ अंश सेल्सियसची नोंद झाली. दरम्यान, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यामुळे सकाळी थंडी तर दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.
राज्यातील धुळे, अहिल्यानगगर, निफाड, जळगाव, पुणे, नागपूर, गोंदिया येथे किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले होते. तर अनेक ठिकाणी धुक्यासह दव पडले होते.
शनिवारी दिवसभरात कमाल तापमानामध्ये वाढ झाली होती. मुंबईच्या सांता्क्रूझ भागात कमाल तापमानात 35 अंशांची नोंद झाली. तर पुण्यातही काही भागांमध्ये 33 अंशांपर्यंत कमाल तापमान गेलं होतं.