Friday, January 17, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजवळीक की दुरावा...

जवळीक की दुरावा…

हलकं-फुलकं : राजश्री वटे

ते दोघे वेगवेगळ्या काळातील…
एक आधीच्या वर्गातील शेवटच्या बेंचवरचा…
दुसरा पुढच्या वर्गातील पहिल्या बेंचवरचा!!
दोन्ही वर्ग एकमेकांना मधल्या भिंतीने साधलेले!
एक वर्ग संपल्याची भिंत तर…
दुसरी पुढल्या वर्गाची सुरुवात करणारी…
एका मागे एक…
एकाची शेवट दुसऱ्याची सुरुवात!
दोन वर्गांची नावं…
१ डिसेंबर…
दुसरा जानेवारी…
एक वर्ग संपला की दुसरा सुरू…
पण या दोघांमध्ये एक वेगळंच नातं आहे…
आहेत पाठोपाठ पण तरी दूरदूर…
एका वर्गात जुन्या आठवणी…
तर पुढील वर्गात नवीन वचनांची सुरुवात!
पण इतकं अंतर दोघात असूनही ते जवळजवळ आहेत… आणि बरंचस साम्य ही दिसतं दोघांमध्ये!!

सगळं खरं तेच आहे पण तरीही दोन टोकं आहेत… तेवढेच दिवस… तेवढ्याच तारखा… तेवढेच तास आणि तशीच गुलाबी थंडी… प्रसन्नतेने वेढलेले हे डिसेंबर- जानेवारीची जोडगोळी!!
पण… तरीही दोघांचे अंदाज रंगढंग वेगळे भासतात…
एकामध्ये शेवटचा दिवस…
ती रात्र संपली की त्याचं अस्तित्व संपलं…
तर दुसऱ्याची सूर्य उगवताच नवीन दिवस नवी आशा पांघरून सुरुवात होते!
एकामध्ये गेलेले क्षण…
दुसऱ्यामध्ये येणारी आशा…
एकामध्ये अनुभव…
दुसऱ्यामध्ये विश्वास…

जे पहिल्यामध्ये पूर्ण होत नाही त्याची पूर्णता करण्याचे आश्वासन जानेवारी घेतो व परत डिसेंबरपर्यंत पोहोचून पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न चालू ठेवतो… हे चक्र निरंतर चालू असतं!
कसं आहे नं… हा जानेवारी ते डिसेंबरचा प्रवास करायला एक वर्ष म्हणजे १२ महिने लागतात, पण डिसेंबरमधून जानेवारीमध्ये पोहोचायला… बस… काही क्षणात!!
जानेवारीपासून डिसेंबर या पूर्ण वर्षात बऱ्याच उलाढाली होतात पण डिसेंबर ते जानेवारी वर्षच बदलून टाकतं…
पुढच्या वर्षी बघू काय ते!
असं बिनधास्त बोललं जातं… इतका जानेवारी आश्वस्त करतो.
म्हणायला हे दोघं आहेत… पण यातून त्यात जायला किती काही बदलून जातं!

दोघांना अकरा महिन्यांनी बांधून ठेवलं आहे आणि या विरहाला दोघांनी एका सोहळ्याचं, जल्लोषाचं स्वरूप दिलं आहे.
डिसेंबर म्हणतो, मी जे अपूर्ण कार्य ठेवलं आहे ते जानेवारीच्या सुपूर्द करून जात आहे… पुन्हा अकरा महिन्यांनंतर मी येईन तेव्हा ते कार्य नक्कीच पूर्णत्वाकडे गेलेलं असणार… हा झाला एकमेकांवरील विश्वास दोघांचा!
अशी या दोघांची दोस्ती!!
तू असा जवळी रहा…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -