श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पॅडेक्स मोहिमेचे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले आहे. रात्री १० वाजता याचे प्रक्षेपण करण्यात आले. भारताचे हे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे अंतराळातील एक मैलाचा दगड मानले जात आहे.
भारताच्या स्पॅडेक्स मोहिमेंतर्गत पीएसएलव्ही सी ६० रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण होणार आहे.या दोन उपग्रहांचे मिळून एकूण वजन सुमारे २२० किलो आहे. यापैकी एक चेझर आणि एक लक्ष्य असेल. अंतराळात डॉकिंग – अनडॉकिंग जानेवारी २०२५ मध्ये केले जाईल. हा प्रयोग पृथ्वीपासून ४७० किमी अंतरावर होईल. प्रयोगानंतर दोन्ही उपग्रह पृथ्वीभोवती दोन वर्षे फिरतील.
उपग्रह चेझरमध्ये कॅमेरा आहे तर उपग्रह लक्ष्यात दोन पेलोड आहेत. प्रयोग यशस्वी झाल्यावर इस्रोला कक्षेतून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या दिशेने जाणारा भाग पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळेल. कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पॅडेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयानं अंतराळात एकमेकांशी जोडली जातील. सोप्या भाषेत सांगायचे तर दोन्ही उपग्रह अंतराळात या तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांशी जोडले जातील.याला डॉकिंग म्हणतात. त्यानंतर, दोन्ही उपग्रह अंतराळात वेगळे होतील. याला अनडॉकिंग म्हणतात.
भारताला भविष्यात चंद्रावर माणूस पाठवून संशोधन करायचे आहे. मंगळ ग्रहावर यानाच्या मदतीने संशोधन करायचे आहे. या दोन्ही स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्पॅडेक्स मोहीम यशस्वी होणे आवश्यक आहे. यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना चालना मिळेल. यामुळे स्पॅडेक्स मोहिमेसाठी होत असलेले प्रक्षेपण भारतासाठी महत्त्वाचे आहे.