
अनुचित प्रकार घडू नये म्हणून केळवा पोलिसांची विशेष खबरदारी
सफाळे : ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे बीचला (Kelve Beach) पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी करणार आहेत. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केळवे सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. केळवारोड स्थानकाच्या पश्चिमकिनारपट्टी भागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. उद्या मंगळवार ३१ डिसेंबर २०२४ या वर्षांचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवशी बुधवार आल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या नवर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची थोडी गोची झाली आहे मात्र त्यातही आनंदाचा पार हा उंचावलेलाच आहे. पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागांतूनही पर्यटक प्रचंड संख्येने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बीच परिसरात छोटे-मोठे असे ६० ते ७० रिसॉर्टस असून विविध प्रकारचे व्हेज, नॉनव्हेज पदार्थांनी पर्यटकांना आकर्षित करण्यास ते सज्ज झाले आहेत. केळवे बीचला शासनाकडून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधि मंजूर झाल्याने काही प्रमाणात विकासकामे झाली आहेत.
/>
नाताळच्या सुट्टीपासून आपल्या कुटुंबासह पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्रमुळे पर्यटक नेहमीच येथे आकर्षित झाले आहेत. परंतु काही मद्यधुंद तरुणाच्या टोळक्यांमुळे तरुणींची छेडछाड करणे, सुरूच्या बागेत धिंगाणा घालणे, भांडणे, हाणामाऱ्या यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, मात्र, केळवे येथे काही वर्षांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या केळवे सागरी पोलीस ठाण्यामुळे येथील पर्यटनाला मोठी शिस्त लागली असून बिचवर मद्यपान करणे, धांगडधिंगा घालणे, महिलांची छेडछाड करणे अशा प्रकारांना चांगलाच आळा बसला आहे. पोलिसांकडून होणाऱ्या कडक कारवाईमुळे येणाऱ्या राडेबाज टोळक्यांचे केळवे बिचवर येणे बंद झाले आहे. पूर्वी दरदिवशी होणारी भांडणे, मारामाऱ्या, बिचवर वाजवण्यात येणारे बेंजो, लाऊडस्पीकर यांचे कानठळ्या बसविणारे आवाज थांबले गेले. तसेच तरुणांच्या टोळक्यांकडून पर्यटकांशी होणारे गैरवर्तनही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे बिचवर आता कौटुंबिक पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. नाताळच्या सुट्टीमुळे गेल्या काही दिवसांत आपल्या कुटुंबासह येणारे पर्यटक वाढले असून येथील निसर्गरम्य परिसरचा आणि समुद्रात पोहोण्याचा सर्वच मनमुरादपणे आनंद घेताना दिसत आहेत. अशातच आता ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी येथील रिसॉर्ट्स आणि समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जाणार आहे. त्या दृष्टीने बीच परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विजेची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
केळवे बीच व परिसरात पेट्रोलिंग सुरू करण्यात आले असून समुद्रातील धोकादायक भागात होर्डिंग लावण्यात आले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनाही सीसीटीव्ही कॅमेरे ऍक्टिव्ह कारण्यासोबत पर्यटकांची माहिती घेणे, मद्यपान करून धिंगाणा करू नये अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हच्या दृष्टीने विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत विशेष बदल करण्यात आले आहेत. एकंदरीतच सेलिब्रेशनमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भऊ नये म्हणून विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. - विजया गोस्वामी, सपोनि केळवे सागरी पोलीस ठाणे