नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अकरा उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. यासाठी पक्षाने विविध राज्यांच्या विधानसभा लढवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या धोरणांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत चार मुसलमान उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आधी राष्ट्रीय पक्ष हा दर्जा होता. पण २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने आढावा घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष हा दर्जा काढून घेतला. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्वात आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे हे एकमेव खासदार आहेत. तर राज्यसभेत राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, सुनेत्रा अजित पवार आणि नितीन पाटील हे खासदार आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष हा दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात ?
- लोकसभेतील किमान दोन टक्के जागा किमान तीन वेगवेगळ्या राज्यांतून जिंकणे आवश्यक
- लोकसभेत चार खासदार असावेत. तसेच चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळवणे आवश्यक
- किमान चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा
दिल्ली विधानसभा निवडणूक – राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी
- बुराडी – रतन त्याकी
- बादली – मुलायम सिंह
- मंगोल पुरी – खेमचंद
- चांदनी चौक – खालिद उर रहमान
- बल्लीमारान – मोहम्मद हारून
- छतरपूर – नरेंद्र तंवर
- संगम विहार – कमर अहमद
- ओखला – इमरान सैफी
- लक्ष्मी नगर – श्री नमा
- सीमा पुरी – राजेश लोहिया
- गोकल पुरी – जगदीश भगत
दिल्ली विधानसभा – एकूण जागा ७०
जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता