बदलापूर : सध्या राज्यभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये साततत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच बदलापूरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर यामध्ये पीडित मुलीच्या मैत्रिणीनेच आरोपीला अत्याचार प्रकरणात मदत केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून २१ डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतले होते. यावेळी तिघांनी मिळून मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान, पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. २३ डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. तसेच तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.