Thursday, March 20, 2025

सुखिया जाला

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानेश्वरी या रसाळ ग्रंथाचा समारोप करताना ज्ञानदेव म्हणतात,
‘याकरिता तुम्ही संतजनांनी माझ्याकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून जो ग्रंथ करविला, तो अनुपम आहे.’
‘म्हणोनि तुम्हीं मज संतीं। ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं।
उपयोग केला, तो पुढती। निरुपम जी।’ ओवी क्र. १७९१
या ओवीतून जाणवतो ग्रंथाचा गौरव. त्याचबरोबर जाणवते ज्ञानदेवांची विलक्षण नम्रता, ज्यापुढे नत व्हावं.
हा ग्रंथ कशासाठी निर्मिला? त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून.

इथे स्पष्ट होतो यामागचा उदात्त हेतू. संपूर्ण मानवजातीचे कल्याण व्हावे या उद्देशाने हा ग्रंथ निर्माण केला गेला. परोपकाराचा हा उद्देश बाळगणाऱ्या अनेक गोष्टींचा दाखला ज्ञानदेव देतात. त्यानंतर ते म्हणतात, या साऱ्या गोष्टींपेक्षा हा ग्रंथ सरस आहे, कारण त्यांच्यात काही ना काही उणीव आहे. या ग्रंथात मात्र अशी कोणतीही उणीव नाही. आता पाहूया हे अलौकिक दाखले.

ब्रह्मदेवाला कमीपणा आणणारी सृष्टी विश्वामित्र ऋषींनी त्रिशंकू राजासाठी निर्माण केली; परंतु ही सृष्टी नाशवंत होती. याउलट ‘गुरो, तुमची गीता-ग्रंथरूपी सृष्टी मात्र शाश्वत आहे.’

खरंच आहे हे! ‘गीता’, ‘ज्ञानेश्वरी’तून सांगितले गेलेले तत्त्वज्ञान काल होते, आज आहे आणि उद्याही असणार आहे. या अर्थाने ते कालातीत आणि शाश्वत आहे. पुढील दाखला दिला आहे तो भगवान शंकरांचा. त्यांनी भक्त उपमन्यूवरील प्रेमाने क्षीरसागर निर्माण केला; परंतु पुढे त्या समुद्रातून हलाहल विषही निघाले. याउलट गीताग्रंथ म्हणजे ज्ञानाचा, अमृताचा सागर होय. त्यात विषाचा, वाईटपणाचा अंशदेखील नाही.

यानंतरचा दृष्टान्त सूर्य आणि चंद्र यांचा आहे. सर्व जगाला प्रकाशित करणारा सूर्य कल्याणकारी खरा; परंतु त्याची उष्णता काही वेळा दाहक होते. तसेच जगास शीतलता, शांती देणारा चंद्रही उपकारकर्ता आहे; परंतु त्याच्यावर कलंक आहे. आता गीता-ग्रंथाबाबत काय बोलावे? तो जगाला ज्ञान देऊन प्रकाशित करतो, मानवी मनातील अंधार दूर करतो; परंतु तो सूर्याप्रमाणे दाहक नाही. हा ग्रंथ चंद्रासारखा शीतल आहे. संसारात तापलेल्या जीवांना उपदेश करून थंडावा देतो. पण त्याच्या ठिकाणी कोणताही कलंक नाही.

अशाप्रकारे विश्वामित्राची सृष्टी, क्षीरसागर, सूर्य आणि चंद्र या सगळ्यांशी ज्ञानदेवांनी या ग्रंथाची तुलना केली आहे. या सर्वांहून हा सरस आहे असंही सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी शब्द वापरला की हा निरूपम आहे. म्हणजेच ‘या सम हा’ असा आहे. साक्षात ज्ञानदेवांनी ‘निरूपम’ म्हणून गौरविलेल्या या गीता-ग्रंथाचा आस्वाद आपण का न घ्यावा? याच निरूपम ग्रंथावर आधारित अमृतमय ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेण्यातही आपण उशीर का करावा?
चला करूया नववर्षात शुभारंभ, या ग्रंथाच्या वाचनाला !

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -